
अकरावी ऑनलाइनपाठोपाठ आता आयटीआय प्रवेशही सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या निकालामुळे खोळंबले आहेत. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालानंतरच आयटीआय प्रवेश सुरू करण्याचा निर्णय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे.
राज्यातील सरकारी, खासगी आयटीआयमधील जागांवर मागील काही वर्षांत केंद्रीय मंडळाच्या किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता, याची माहिती संचालनालयाने मागविली होती. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन आयटीआय प्रवेश प्रक्रिया सीबीएसई, आयसीएसईच्या निकालानंतरच सुरू केली जाणार आहे. प्रत्येक वर्षी केंद्रीय मंडळातील सुमारे 5 हजारांहून अधिक विद्यार्थी आयटीआयच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीत अर्ज करत असतात. त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यास त्यावर आक्षेप घेतला जाण्याची शक्यता असल्याने संचालनालयाने केंद्रीय मंडळाच्या दहावीच्या निकालापर्यंत पुढील प्रवेश प्रक्रिया थांबवली असल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत तब्बल दोन लाख विद्यार्थ्यांनी आयटीआयच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत, मात्र संचालनालयाच्या या निर्णयामुळे अर्ज करणाऱया या विद्यार्थ्यांची रखडपट्टी होणार आहे.
आयटीआयच्या 419 शासकीय आयटीआय आहेत. यामध्ये यंदा 93 हजार 904 प्रवेशाच्या जागा आहेत, तर 572 खासगी संस्थांमध्ये 55 हजार 364 जागा अशा एकूण 1 लाख 49 हजार 268 जागा उपलब्ध आहेत. आतापर्यंत तब्बल 1 लाख 79 हजार 532 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.



























































