भाजपच्या उमेदवाराविरोधात 240 तर काँग्रेस उमेदवाराविरोधात 204 गुन्हे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात रिंगणात असलेल्या 1,612 उमेदवारांपैकी 1,594 उमेदवारांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. असोशिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सने तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारांबाबतचा आर्थिक, गुन्हेगारी आणि शैक्षणीक अहवाल सादर केला आहे. त्यातून ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. एडीआरच्या या अहवालानुसार काँग्रेसच्या 90 पैकी 40 उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. तर भाजपच्या 97 पैकी 38 उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहे. बसपाचे 92 पैकी 19, सीपीएमच्या 19 पैकी 11, सपाच्या 10 पैकी 5, राष्ट्रवादीच्या 10 पैकी 6 आणि तृणमूल काँग्रेसच्या 9 पैकी 4 उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.

विशेष म्हणजे केरळच्या पत्तनमथिट्टा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुरेंद्रन यांच्याविरोधात 240 गुन्हे दाखल आहेत. त्यातील 129 गंभीर स्वरुपाचे आहेत. तर केरळच्याच इडुक्की मतदारसंघातील काँग्रेसच उमेदवार डीन कुरियाकोस यांच्यावर 204 गुन्हे दाखल असून 37 गंभीर स्वरुपाचे आहेत. बिहारच्या मधेपुरा मतदारसंघातील जन अधिकार पक्षाचे राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांच्यावर 31 गुन्हे दाखल असून गंभीर कलमांखाली त्यांच्यावर 36 गुन्हे दाखल आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 115 मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यातील 63 मतदारसंघ अॅलर्टवर आहेत. या मतदारसंघात तीनपेक्षा जास्त उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महाराष्ट्रातील माढामध्ये 31 उमेदवार रिंगणात असून 12 जणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. सांगलीत 9 तर पुण्यात 8 उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. बिहारच्या झंझारपूर, अररिया आणि सुपौलमध्ये सात गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार आहेत.

तिसऱ्या टप्प्यातील 788 उमेदवार म्हणजे 49 टक्के उमेदवारांचे शिक्षण 5 ते 12 वी पर्यंत झालेले आहेत. 681 उमेदवारांनी पदवी किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतले आहे. 57 उमेदवार साक्षर असून 23 उमेदवार निरक्षर आहेत. या टप्प्यात फक्त 9 टक्के महिला उमेदवार आहेत. 1612 उमेदवारांपैकी 142 महिला उमेदवार आहेत. या टप्प्यातील 11 उमेदवारांनी संपत्ती शून्य असल्याचे दाखवले आहे. तर 25 उमेदवार करोडपती आहेत.