
सामना प्रतिनिधी । मुंबई
वांद्रे येथील ‘एमटीएनएल’ कार्यालयाच्या इमारतीला सोमवारी दुपारी 3.10 वाजण्याच्या सुमारास लागलेली भीषण आग आज तब्बल 22 तासांनी आटोक्यात आली. ‘एमटीएनएल’च्या या मध्यवर्ती कार्यालयातून फोन-इंटरनेट सेवेसाठी मोठय़ा प्रमाणावर असलेल्या वायरिंगमुळे ही आग आज दुपारपर्यंत धुमसत होती. दरम्यान, आग आटोक्यात आली तरी सायंकाळी उशिरापर्यंत कूलिंग ऑपरेशन सुरू होते.
वांद्रे येथील ‘एमटीएनएल’च्या इमारतीला लागलेल्या आगीत अग्निशमन दलाने केलेल्या बचावकार्यात तब्बल 85 कर्मचाऱयांची सुखरूप सुटका केली. इमारतीमधील कर्मचाऱयांनी आग लागताच टेरेसवर धाव घेतली. टेरेसवरील सर्व कर्मचाऱयांची शिडीच्या सहाय्याने सुटका करण्यात आली. या दुर्घटनेत कुणी जखमी झाले नसले तरी इमारतीमधील तिसऱया व चौथ्या मजल्यावर लागलेली आग सातव्या मजल्यापर्यंत भडकत गेली. आगीची भीषणता इतकी होती की, अर्ध्या तासातच ‘फायर लेव्हल-4’ची सर्वात मोठी आग असल्याचे जाहीर करण्यात आले.
‘एमटीएनएल’च्या इमारतीचे फायर ऑडिट 2018 मध्येच झाल्याचे समजते. ही आग एसीमधील शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून चौकशी सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
अनिश्चित काळासाठी एमटीएनएलचे ऑफिस बंद
मोठ्या प्रमाणात आगीचे लोट आणि धूर संपूर्ण इमारतीमध्ये पसरला होता. शिवाय सातव्या मजल्यापर्यंत आग परसल्याने यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या इमारतीत पुन्हा काम सुरू होण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे या दरम्यान हे ऑफिस बंद राहणार आहे. दरम्यान, सोमवारी आग लागली असली आज मोठय़ा प्रमाणावर कर्मचाऱयांनी गर्दी केली होती.
आगीमुळे बाजूची कर्मचारी वसाहत बंद
एमटीएनएलच्या इमारतीत लागलेल्या आगीची झळ बाजूला असलेल्या कर्मचारी वसाहतीला बसली आहे. एमटीएनएल कर्मचाऱयांची चार कुटुंबे बाजूच्या इमारती राहत होते. आगीनंतर ही इमारत बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे येथे राहणाऱया कर्मचाऱयांच्या कुटुंबीयांना सध्या नातेाईक, मित्रमंडळीकडे राहावे लागले आहे.
आगीमुळे 25 हजार टेलिफोन लाइन बंद
भीषण आगीनंतर वांद्रे व खार परिसरातील टेलिफोन सेवा ठप्प झाली आहे. जवळपास 25 हजार टेलिफोन लाइन बंद पडल्या आहेत. त्या पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र सुरळीत होण्यासाठी अजूनही 48 तासांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले.
आग लागली तेव्हा अलार्म वाजला नाही
इमारतीत धूर पसरल्यानंतर आग लागल्याचे समजले. मात्र आगीची पूर्वसूचना देणारा अलार्म वाजलाच नाही. त्यामुळे अलार्म सुस्थितीत होता का यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अग्निशमन यंत्रणाही कार्यक्षम नसल्याचे बोलले जाते आहे. त्यामुळे अग्निशमन यंत्रणेचे उल्लंघन करण्यात आले हेते का, याचा तपासही केला जात असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.


























































