हिंदुस्थानने बांगलादेशचा कानपुरमध्ये पराभव करत दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकली. याचबरोबर टीम इंडियाचा हा सलग 18 वा कसोटी मालिका विजय ठरला आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे दोन दिवस खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे चौथ्या आणि पाचव्या दिवशी टीम इंडियाने टी-20 स्टाईलमध्ये फलंदाजी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यावरुन रोहित शर्माने माध्यमांशी संवाद साधताना महत्वाचं वक्तव्य केले आहे.
दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे अखेरच्या अडीच दिवसांमध्ये टीम इंडियाने टी-20 स्टाईल फलंदाजी करत बांगलादेशच्या बत्त्या गुल केल्या. बांगालादेशने पहिल्या डावात 233 आणि दुसऱ्या डावात 146 धावा केल्या. तर टीम इंडियाने आपल्या पहिल्या डावात 34.4 षटकांमध्ये 285 धावा कुटून काढल्या. दुसऱ्या डावात टीम इंडियाला फक्त 95 धावांचे आव्हान मिळाले होते. टीम इंडियाने 3 विकेट गमावत लक्षाचा यशस्वी पाठलाग करत सामना जिंकला आणि मालिका सुद्धा.
मालिका विजय साजरा केल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने माध्यमांशी संवाध साधला. तो म्हणाला की, अडीच दिवस वाया गेल्यामुळे चौथ्या दिवशी आम्हाला त्यांना झटपट बाद करायचे होते. 233 धावांवर त्यांना बाद केल्यानंतर आमच्या फलंदाजीची वेळ आली. बॅटने आम्ही काय करू शकतो ते आम्हाला बघायचे होते. या मैदानावर विजय मिळवने हा एक मजेदार अनुभव होता. ही जोखीम घेण्यासाठी आम्ही तयार होते. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीची फलंदाजी करता, तेव्हा कमी धावसंख्येवर बाद होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे 100-120 धावांवर बाद होण्याची आमची तयारी होती, असे रोहित शर्मा म्हणाला आहे.