
अभिनेत्री कंगना राणावतने स्वातंत्र्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी थेट समर्थन केले आहे. कंगना जे म्हणाली त्याच्याशी मी सहमत आहे. हे स्वातंत्र्य भीक मागूनच मिळालं आहे. हे स्वातंत्र्य दिलं गेलं आहे. आपले स्वातंत्र्यवीर जेव्हा फाशीवर जात होते तेव्हा फाशीपासून त्यांना वाचवलं नाही, अनेकजण बघत राहिले असा आरोप गोखले यांनी केला. मतपेढीचे राजकारण सुरू झाल्यापासून वाद निर्माण होत आहे, असे ते म्हणाले.
वयाच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीनं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी पत्रकारांशी बोलताना गोखले यांनी कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.
ते म्हणाले, कंगना म्हणाली ते खर आहे. कुणाच्या मदतीने स्वातंत्र्य मिळाले नाही ते भिकेतच मिळाले आहे. आपले स्वातंत्र वीर जेव्हा फासावार जात होते तेव्हा अनेकजण बघत राहिले. राजकीय वर्तुळात परिस्थिती गंभीर झाली आहे. मी कोणाची नावे घेत नाही, परंतु ब्राम्हण समाजावर टीकेची झोड उठवणे मराठा आणि ब्राम्हणमध्ये मतभेद निर्माण करणे, काय चाललयं हे? कुणबी क्षत्रीय हे सर्व माझे आहेत. दलितांना दलित म्हणणं मला पटत नाही. आपल्या देशाचा इतिहास बाबरापासून सुरु होतो आणि तो छापला जातो हे दुर्देव आहे बाबरापूर्वी कुणी नव्हते का? असा सवाल त्यांनी केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मोठे व्यक्तिमत्व होते. माझ्या दृष्टीने बाबासाहेब या देशाला कळले नाहीत. त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. जे 70 वर्षात झाले नाही ते पंतप्रधान मोदींनी केले. पक्षाचे काम सर्वच करतात, पण मोदी देशासाठी चांगल काम करतात, असे कौतुक करून गोखले यांनी शिवसेना-भाजप एकत्र आल्यास फार बरे होईल. मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधिल नाही, नव्हतो आणि नसेनही, असे स्पष्ट केले.
देश कधीही हिरवा होणार नाही
विक्रम गोखले म्हणाले, लाल बहादूर शास्त्री वगळता आतापर्यंत देशातील सर्व पंतप्रधानांना मी शंभराच्या खाली गुण देतो. पण त्यांची जयंती ही 2 ऑक्टोबरला येते ती हेतुपुरस्सर पुसली जाते. त्याचा विसर पाडला जातो. किती वर्षे कारस्थान आहे? हा देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे.
फडणवीस म्हणाले माझी चूक झाली
शिवसेना- भाजप युतीबाबत मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा केली. त्यांना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर तुमचं तरी काय बिघडलं असतं?, असा प्रश्न मी देवेंद्र फडणवीसांना विचारला होता. त्यावर त्यांनी झाली चूक असं मान्य केलं आहे,’ असा दावा विक्रम गोखले यांनी केला, हे खरं तर ही एकटय़ा फडणवीसांची चूक नाही. त्यांच्यात जे काही झालं होतं, त्याबाबत त्यांनी जनतेला विश्वासात घ्यायला हवं होतं, असे गोखले म्हणाले.
महाराष्ट्रातील गणित चुकलेलं आहे हे सुधारायचं असेल तर भाजप आणि शिवसेना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. शिवसेना- भाजपला एकत्र आणण्याकरता माझे प्रयत्न चालू आहेत, असे विक्रम गोखले यांनी सांगितले.

































































