कुलगुरूंच्या भूमिकेविरोधात कृषी पदवीधरांचा एल्गार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर टिकाटिप्पणी करत अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनस्थळी उपस्थित राहून समर्थन करणारे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांची भूमिका कृषी पदवीधरांवर अन्याय करणारी असल्याचा आरोप करत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व राहुरी कृषी विद्यापीठातील पदवीधर विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून परभणी व राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलसचिव व अधिष्ठाता यांना निवेदन देण्यात आले.

एकीकडे कृषी अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी आयोगाच्या निषेधार्थ आंदोलन करत आहेत, तर दुसरीकडे सर्व कृषी पदवीधर आयोगाच्या सद्यस्थितीतील अभ्यासक्रमाच्या समर्थनार्थ सरसावल्याने 10 जिह्यांचे कार्यक्षेत्र असलेले राहुरी कृषी विद्यापीठ चर्चेला आले आहेत.

अभ्यासक्रम सुधारित करून कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांवर अन्याय केल्याचे भासवून या अभ्यासक्रमात बदल करावा म्हणून पंधरा दिवसांपासून राहुरी कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील वारंवार उपस्थित राहून समर्थन करत लोकसेवा आयोगाच्या कामकाजावर ताशेरे ओढत आयोगाने ठेवलेला अभ्यासक्रम आणि निर्णय प्रक्रिया चुकीची असल्याचे सांगत आहेत. डॉ. प्रशांतकुमार पाटील हे सर्व कृषी पदवीधर विद्यार्थ्यांचे कुलगुरू असताना केवळ कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचेच समर्थन का करत आहेत, असा सवाल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व राहुरी कृषी विद्यापीठातील इतर कृषी पदवीधर विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील हे केवळ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांप्रति प्रेम दाखवत असून, इतर विद्यार्थ्यांच्या मार्गात अडथळा निर्माण करत आहेत. राहुरीचे कुलगुरू पाटील हेच केवळ आयोगाच्या निर्णयावर आक्षेप घेत असून, इतर कुलगुरू का आक्षेप घेत नाहीत, असा सवाल उपस्थित करत लोकसेवा आयोग ही घटनात्मक संस्था असताना टीका करणे डॉ. पाटील यांना शोभते का, असे कृषी पदवीधर विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. लोकसेवा आयोग, शासन तसेच राज्यपाल याबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत कृषी पदवीधर विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री, राज्यपाल, कृषी सचिव, प्रधान सचिव यांना निवेदन सादर केले आहे.

कृषी स्पर्धा परीक्षेमध्ये कृषी अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रमात समावेश करावा, ही मागणी करत अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांचे राहुरी कृषी विद्यापीठात पंधरा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. कृषी पदवी अभ्यासक्रमात कृषी व्यवस्थापन, व्यवसाय व्यवस्थापन, कृषी उद्यानविद्या, फिशरी, फॉरेष्ट्री, व्हेटर्नरी, जैव तंत्रज्ञान पदवीचा समावेश आहे. भविष्यात या अभ्यासक्रमाची पदवी स्वतंत्र असल्याने कृषी स्पर्धा परीक्षेत या अभ्यासक्रमाचादेखील समावेश करावा, अशी मागणी येण्याची शक्यता असल्याचे वृत्त दै. ‘सामना’ प्रसिद्ध केले होते.