
नगर येथील जिल्हा रुग्णालयाच्या अग्निकांडप्रकरणी अटकेच्या शक्यतेने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने डॉ. पोखरणा यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करत तात्पुरता दिलासा दिलासा दिला आहे. या प्रकरणी 17 नोव्हेंबरला सुनावणी होणार असून, पोलिसांना म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
6 नोव्हेंबर रोजी जिल्हा रुग्णालयातील एका इमारतीमध्ये सुरू करण्यात आलेल्या कोरोना अतिदक्षता विभागात आग लागली. यात 11 रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी रुग्णालय प्रशासनाकडून पोलिसात घटनेची नोंद न आल्यामुळे पोलिसांनीच स्वतःहून कलम 304 (अ) नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर या गुन्ह्यात 304 कलम वाढविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, स्टाफ नर्स सपना पठारे, आस्मा शेख, चन्ना आनंत यांना अटक करण्यात आली. रुग्णालय प्रशासनाचे प्रमुख डॉ. पोखरणा यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पुढे येत आहे. त्यामुळे या गुन्ह्यात अटकेच्या शक्यतेने डॉ. पोखरणा यांनी 12 नोव्हेंबरला अॅड. पी. डी. कोठारी यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. 13 नोव्हेंबर रोजी न्यायमूर्ती एम. आर. नातू यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी झाली.
तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात डॉ. पोखरणा यांना अटक करण्यासाठी कोणतेही कारण सध्या दिसून येत नाही, असे मत नोंदवत न्यायालयाने डॉ. पोखरणा यांना अंतरिम अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे. तपासी अधिकार्यांना तपासात सहकार्य करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. डॉ. पोखरणा यांच्या अर्जावर पुढील सुनावणी 17 नोव्हेंबरला होणार असून, या अर्जावर पोलिसांना म्हणणे सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
चौघांच्या जामिनावर मंगळवारी सुनावणी
जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेप्रकरणी दाखल गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या वैद्यकीय अधिकारी शिंदे यांच्यासह स्टाफ नर्स शेख, पठारे व चन्ना यांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केले असून, या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले.
























































