
नगर शहरातील गुटखा तस्करीचे रॅकेट कोतवाली पोलिसांनी उद्ध्वस्त केले असून, दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल 1 कोटी सहा लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दहाजणांना अटक करण्यात आली आल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली.
राकेशकुमार जगदंबाप्रसाद मिश्रा, अभिजित गोविंद लाटे, राहुल कैलासनाथ सिंग, अझर शकील शेख, चंद्रकेश शोभनाथ तिवारी, शिवप्रकाश रामकुमार तिवारी, मोहसीन शब्बीर पटेल, अर्जुन शंकर यादव, नितीन सुनील साठे, शादाब शब्बीर पटेल अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून, पत्र्याच्या शेडचा मालक रावसाहेब शिवाजी भिंगारदिवे हा फरार आहे. दरम्यान, दहा आरोपींना 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नगर शहरामध्ये गोवा गुटखा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने मार्केट यार्ड परिसरामध्ये सापळा रचला होता. मार्केट यार्ड परिसरामध्ये एका पान टपरीजवळ आरोपी राकेशकुमार मिश्रा व अभिजित लाटे हे गुटख्याचे पुडे दाखवून विक्री करत असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या ताब्यातून पुडे घेऊन त्यांची अधिक चौकशी केली असता हा माल विक्रीसाठी आणल्याचे त्यांनी सांगितले. आरोपी लाटे याने हा माल एमआयडीसी येथील मोहसीन शब्बीर पटेल याचा असल्याचे सांगितले. यानंतर एमआयडीसीत तत्काळ दुसरे पथक पाठवून कारवाई करण्यात आली. यावेळी पटेल यांच्या फरशीच्या गोडाऊनजवळ काहीजण हे पत्र्याच्या शेडमध्ये गुटख्याची पाकिटे मोजत असल्याचे निदर्शनास आले. हा माल ते विक्रीसाठी घेऊन जाणार होते. पोलिसांनी आरोपींचा 97 लाख 93 हजार 920 रुपयांचा गुटखा, तीन लाख 62 हजार 800 रुपयांचा सुगंधी तंबाखू, दोन लाख 35 हजार रुपयांचे मोबाईल, 2 लाख रुपयांच्या 4 दुचाकी व 32 हजार रुपये रोख, असा एक कोटी 6 लाख 23 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, या जागेचा मालक फरार झाला आहे.
पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र इंगळे, पोलीस नाईक योगेश भिंगारदिवे, सलीम शेख, संतोष गोमसाळे, शाहीद शेख, गणेश धोत्रे, सागर पालवे, राहुल गवळी, राजू शेख, संदीप थोरात, दीपक साबळे, सतीश भांड, राहुल गुंडू, अमोल गाढे, सोमनाथ राऊत, अभय कदम, दीपक रोहकले, कॉन्स्टेबल अतुल काजळे आदीच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
कोतवाली पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर याप्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. या गुह्याची व्याप्ती मोठी असून, त्यांनी हा गुटखा कुठून आणि कसा आणला, याचा तपास करण्यात येणार आहे. यामध्ये आणखीही आरोपी असण्याची शक्यता आहे. कोतवाली पोलिसांनी तोफखाना व एमआयडीसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जाऊन ही कारवाई केली, अशा प्रकारची कारवाई त्यांना करता येते.
– सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक.





















































