
नगर जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. आता पावसाळ्याचा एकच महिना उरला असून, यंदा गेल्या वर्षीपेक्षा सुमारे 230 मि.मी. पाऊस कमी झाला आहे. भंडारदरा, मुळा या धरणक्षेत्रातही पाऊस कमी पडला. त्यामुळे ही दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी वाट पाहण्याची वेळ आली आहे. दरम्यान, भविष्यात जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यास उत्तर नगर जिल्ह्यावर पाणी संकट ओढावण्याची शक्यता आहे.
सोमवारी (दि. 2) झालेल्या मुसळधार पावसाने शेवगाव, पाथर्डी व नगर तालुक्यात दाणादाण उडाली. या भागात पावसाने अतोनात नुकसान केले आहे. मात्र, जिल्ह्याच्या इतर भागात हा पाऊस अल्प प्रमाणात झाला. त्यामुळे या भागाला पावसाची प्रतीक्षा कायम आहे. यंदा सरासरी पाऊस होईल, असा अंदाज होता. मात्र, हा अंदाज फोल ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. जून आणि जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांत जिल्ह्यात सरासरी 376 मि.मी. पाऊस पडला आहे. पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, नेवासा, राहुरी, संगमनेर, कोपरगाव या तालुक्यांत आजपर्यंतचा झालेला पाऊस 300 मि.मी.पेक्षा कमी आहे. नगर, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, अकोले, श्रीरामपूर व राहाता या सात तालुक्यांनी पावसाची 300 मि.मी.ची सरासरी ओलांडली आहे.
पावसाळयातील अखेरचा सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. या महिन्यात जिल्ह्याला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस झाला नाही तर खरीप पिकांसारखेच रब्बी पिकांसमोर संकट उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. धरणक्षेत्रात पाऊस कमी झाला असल्यामुळे मुळा धरण 85, तर भंडारदरा धरण 90 टक्के भरले आहे.
तीन महिन्यांचा पाऊस मि.मी.मध्ये
नगर 301.7 मि.मी., पारनेर 271.9, श्रीगोंदा 242.7, कर्जत 285.6, जामखेड 389.6, शेवगाव 313.6, पाथर्डी 326.5, नेवासा 297.1, राहुरी 281.9, संगमनेर 231, अकोले 360.6, कोपरगाव 284.6, श्रीरामपूर 7.8, राहाता 315 मि.मी.
सात तालुक्यांत अल्प पावसाची नोंद
नगर जिल्ह्यातील सात तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे. पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, नेवासा, राहुरी, संगमनेर, कोपरगाव या सात तालुक्यांत आतापर्यंतचा पाऊस 300 मि.मी.पेक्षा कमी आहे. हे तालुके जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.


























































