नगर जिल्हा बँकेच्या चार जागांसाठी शनिवारी मतदान, चारही जागांवर दुरंगी लढत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चार जागांसाठी येत्या शनिवारी (दि. 20) मतदान होत आहे. मतदान प्रक्रियेसाठी सहकार विभाग सज्ज झाला आहे. त्यासाठी जिह्यात 14 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आले आहेत. सेवा सोसायटीचे नगर, पारनेर, कर्जत मतदारसंघ व बिगर शेती संस्था या चार जागांसाठी दुरंगी लढत होत आहे.

बँकेच्या 21 जागांपैकी 17 जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित चार जागांसाठी निवडणूक होत आहे. नगर तालुका सेवा सोसायटी मतदारसंघात माजी आमदार शिवाजी कर्डिले व सत्यभामाबाई बेरड यांच्यात कर्जतमध्ये अंबादास पिसाळ-मीनाक्षी साळुंके, पारनेरमध्ये रामदास भोसले – उदय शेळके तर बिगरशेती संस्थांचा मतदारसंघात प्रशांत गायकवाड व दत्तात्रय पानसरे यांच्यात सरळ लढत होत आहे.

नगर तालुक्यात 109, कर्जतमध्ये 74, पारनेर 105 व बिगरशेती संस्थांचा मतदारसंघात 1 हजार 376 मतदार आहेत. या मतदारांना त्या-त्या मतदारसंघासाठीच मतदान करावे लागणार आहे. सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत मतदानाची वेळ आहे. मतदानासाठी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.

तालुकानिहाय मतदान केंद्र पुढीलप्रमाणे ः अकोले- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुली) अकोले, जामखेड- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (इंग्रजी- मराठी) जामखेड, कोपरगाव- नगरपालिका शिक्षण मंडळ, नगर- राष्ट्रीय पाठशाला, स्टेशनरोड, नेवासा- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुले), नेवासा खुर्द, पारनेर- न्यू इंग्लिश स्कूल, पारनेर, पाथर्डी- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नाथनगर, राहाता- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चितळीरोड, राहाता, राहुरी- कै. लालाशेठ बिहाणी विद्यामंदिर प्रशाला, राहुरी, संगमनेर- भिकाजी तुकाराम मेहेर विद्यालय, विद्यानगर, संगमनेर, शेवगाव- आदर्श विद्यामंदिर (माध्यमिक) शेवगाव, श्रीगोंदा- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुलींची), श्रीगोंदा, श्रीरामपूर- दादा वामन जोशी नवीन मराठी शाळा, श्रीरामपूर.

तीन मतदान केंद्रांवर दोन मतपत्रिका

– नगर, कर्जत व पारनेर या तीन मतदान केंद्रांवर दोन मतपत्रिका असणार आहेत, उर्वरित 11 मतदान केंद्रांवर एकच मतपत्रिका राहणार आहे. सेवा सोसायटी मतदारसंघासाठी पांढऱया रंगाची, तर बिगरशेती संस्था मतदारसंघासाठी गुलाबी रंगाची मतपत्रिका राहणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी दिली.