
नगर जिल्ह्यातील नगर-मनमाड, नगर-पुणे, लोणी-संगमनेर या महामार्गांवर वाहनचालकांना अडवून शस्त्र्ााचा धाक दाखवून लूटमार करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. या टोळीकडून सात गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्या ताब्यातून एक लाख 95 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नितीन मच्छिंद्र माळी (वय 22, रा. भोरे चिंचोरे, त़ा राहुरी) गणेश रोहिदास माळी (वय 21, रा. खडकवाडी, मुळा धरणाजवळ, ता. राहुरी), रवि पोपट लोंढे (वय 22, रा. घोडेगाव, ता. नेवासा), नीलेश संजय शिंदे (वय 21, रा. पारिजात चौक, पाइपलाइन रोड, नगर) यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.
दिलीप देवराम तमनर (वय 35, रा. तमनर आखाडा, राहुरी) हे दुचाकीवरून नगर-मनमाड महामार्गावरून घरी जात असताना शिंगणापूर फाटा येथे दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल, बॅग व दुचाकी चोरून नेली होती. या गुह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. तपासादरम्यान राहुल व नितीन माळी यांनी हे कृत्य केल्याचे समोर आले. पथकाने माळी याचा शोध घेतल्यानंतर त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या अन्य साथीदारांना गजाआड केले. या आरोपींकडून सात गुन्हे उघडकीस आले असून, माळी याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत, तर शिंदे याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत.
सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, सोमनाथ दिवटे, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, शंकर लोढे, विशाल दळवी, शंकर चौधरी, दीपक शिंदे, जालिंदर माने, आकाश काळे, राहुल सोळुंके, सागर ससाणे, रणजित जाधव, रोहित येमुल, सागर सुलाने, मच्छिंद्र बर्डे, चालक हेड कॉन्स्टेबल उमाकांत गावडे, बबन बेरड आदींनी ही कारवाई केली.




























































