नगर-मनमाड महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनांच्या रांगाच रांगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर-मनमाड महामार्गावर पावसामुळे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या पावसामुळे खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज घेऊन वाहने चालवावी लागत असल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. त्यामुळे महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाल्याचे चित्र दिसून येत होते.

सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे नगर-मनमाड महामार्गावर सर्वत्र खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. कोपरगाव व शिर्डी रस्त्यावर सावळीविहीर फाटा ते पुणतांबा फाटा चौफुली ते तीन चारी या परिसरात चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जवळपास चार ते पाच तास वाहतूककोंडी झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामामुळे नगर-मनमाड महामार्गाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. तीन चारी परिसरात समृद्धी महामार्गाचे काम सुरू असून, या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. दुचाकी व चारचाकी चालवणाऱ्या वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.