11 दिवसांत साडेचार लाख नगरकरांना लस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्ह्याने लसीकरणात आघाडी घेतली असून, गेल्या 11 दिवसांत चार लाख 61 हजार जणांना लस देण्यात आली. जिल्ह्यात 39 टक्क्यांपेक्षा अधिक लोकांना पहिला, तर 25 टक्के लोकांना दुसरा डोस देण्यात आला असून, एकूण लसीकरणाने 22 लाखांचा टप्पा पार केला आहे. लसीकरणाचे उद्दिष्ट 38 लाख 87 हजार असून, आतापर्यंत 60 टक्के लसीकरण झाले आहे.

नगर जिल्ह्यात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. प्रारंभी लसीकरणाचा वेग कमी होता. हळूहळू हा वेग वाढविण्यात आला. आता 18 वर्षांपुढील सर्वांचेच लसीकरण करण्यात येत आहे. गेल्या 15 दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात लस उपलब्ध होत आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरणाचे उत्तम नियोजन सुरू आहे. जेवढे लसीकरण रोज संपेल, त्यापेक्षा जास्त लस दुसऱया दिवशी त्या केंद्रांना मिळत आहे. सध्या मुबलक लस उपलब्ध होत आहे. जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालये, महापालिकेची केंद्रे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांअंतर्गत गावागावात लसीकरणाची शिबिरे आयोजित करून लसीकरण सुरू आहे.

38 लाख 87 हजार नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट

नगर जिल्ह्यात 38 लाख 87 हजार 764 जणांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यांपैकी आतापर्यंत 16 लाख सात हजारजणांना पहिला डोस (39 टक्के), तर पाच लाख 50 हजार 782 जणांना दुसरा डोस (15 टक्के) देण्यात आला आहे. असे एकूण 21 लाख 78 हजार 214 डोस आतापर्यंत संपले आहेत.

गेल्या 11 दिवसांतील लसीकरण

1 सप्टेंबर – 56,729

2 सप्टेंबर – 29,499

3 सप्टेंबर – 9,719

4 सप्टेंबर – 64,631

5 सप्टेंबर – 6,254

6 सप्टेंबर – 9,846

7 सप्टेंबर – 59,041

8 सप्टेंबर – 90,588

9 सप्टेंबर – 43,856

10 सप्टेंबर – 6,400

11 सप्टेंबर – 85,000

एकूण 4,61,182