व्ही. के. सिंग यांचा हल्ला, मच्छरांवर ‘हिट’ मारले; त्यांची गणती करू की झोपू?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

मध्यरात्री 3.30 वा. घरात मच्छर खूप चावे घेत होते. मग मी ‘हिट’ फवारले. त्यानंतर मेलेले मच्छर मोजत बसायचे की शांतपणे झोपी जायचे, असा सवाल करत परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी बालाकोटवर केलेल्या एअर स्ट्राइकचे पुरावे मागणाऱ्यांवर आज तोफ डागली. पुढील वेळी हिंदुस्थान कुठे ‘स्ट्राइक’ करणार असेल तेव्हा जाताना विरोधकांना विमानाखाली बांधून न्यावे लागेल म्हणजे बॉम्बचा वर्षाव करताना त्यांना टार्गेट दिसेल. नंतर विरोधकांना मुडदे मोजायला तिथेच सोडून यावे लागेल, असा टोलाही सिंग यांनी ट्विटरवरून लगावला.

शहीद जवानाच्या पत्नी, आईने ‘एअर स्ट्राईक’चे पुरावे मागितले

बालाकोट येथे जैश-ए-मोहम्मदच्या तळावर केलेल्या हल्ल्यात 300 दहशतवादी ठार केले असा दावा केला जात आहे. इतक्या मोठय़ा संख्येने दहशतवादी मारले गेले असतील तर त्याचे पुरावे द्या अशी मागणी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवान राम वकील यांच्या पत्नी गीता देवी आणि आई अमितश्री यांनी केली आहे. पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर ‘जैश’च्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. त्यात उत्तर प्रदेशातील मैनपुरीतील जवान राम वकील यांचा समावेश आहे.

जम्मूत सीमेवर पाकडय़ांचा गोळीबार, तोफांचा मारा

जम्मूच्या राजौरी, पूंछ जिह्यात असलेल्या सीमा नियंत्रण रेषेजवळच्या एक डझनहून अधिक लष्करी चौक्या आणि गावांवर पाकिस्तानी लष्कराने काल रात्री बेछूट गोळीबार आणि तोफांचा मारा केला. राजौरी जिह्यात सुंदरबनी सेक्टरमध्ये तोफांचा हा मारा रात्रभर सुरू होता. पूंछमधील कृष्णा घाटी सेफ्टरमध्ये आज सकाळी पाकडय़ांनी तोफगोळे डागले. पाकडय़ांच्या या हल्ल्यास हिंदुस्थानी जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. पुलवामाच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने जम्मूतील राजौरी आणि पूंछ जिह्यातील सीमेवर शस्त्र्ासंधीचे 60 वेळा उल्लंघन केलेले आहे. शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्यात आतापर्यंत चार हिंदुस्थानी नागरिक ठार झाले आहेत.