‘परफेक्ट 10’नंतरही एजाज पटेलला न्यूझीलंड संघात स्थान नाही, गोलंदाजाने सांगितलं कारण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानविरुद्ध मुंबई कसोटीत न्यूझीलंडचा डावखुरा फिरकीपटू एजाज पटेल (Ajaz Patel) याने ऐतिहासिक कामगिरी केली होती. एजाज पटेल याने एका डावात 10 बळी घेण्याची किमया साधली होती. कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये एका डावात संपूर्ण संघ बाद करणारा एजाज पटेल तिसरा गोलंदाज ठरला होता. या कामगिरीनंतरही बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी त्याची संघात निवड झाली नाही.

न्यूझीलंड आणि बांगलादेश (New Zealand vs Bangladesh Test) संघात नववर्षात (2022) दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी नुकतीच न्यूझीलंडच्या संघाची घोषणा करण्यात आली. यात मुंबई कसोटीत एकूण 14 बळी घेणाऱ्या एजाज पटेल याला स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मुंबई कसोटीत एजाज याने पहिल्या डावात 10 आणि दुसऱ्या डावात 4 असे एकूण 14 बळी घेतले होते. या जबरदस्त कामगिरीनंतरही त्याला घरच्या मैदानावर होणाऱ्या मालिकेतून वगळण्यात आले.

चांगल्या कामगिरीनंतरही संघातून डच्चू देण्यात आल्यानंतर एजाज पटेल याने आपल्या मनातील भावना बोलून दाखवली आहे. न्यूझीलंडच्या खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजीसाठी पोषक आहेत. त्यामुळे फिरकीपटूला संघात स्थान मिळणे अवघड आहे. हे एजाज पटेल जाणून आहे. तरीही तो आपल्या वेदना लपवू शकला नाही.

प्रयत्न सुरुच ठेवणार

न्यूझीलंडमध्येही फिरकीला पोषक ठरतील अशा खेळपट्ट्या बनवायला हव्यात, असे एजाज म्हणाला. तसेच मैदानावरील कर्मचारी फिरकीच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना मदत मिळेल अशा खेळपट्ट्या बनवतील अशी आशाही व्यक्त करत त्याने संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहणार असल्याचेही म्हटले.

‘परफेक्ट 10’

33 वर्षीय एजाज पटेल याने मुंबई कसोटी गाजवली होती. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर एजाजने 47.5 षटकांची गोलंदाजी करत हिंदुस्थानचे 10 गडी बाद केले होते. जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांच्यानंतर कसोटीच्या एका डावात 10 बळी घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला होता. याच कसोटीच्या दुसऱ्या डावतही त्याने 4 बळी मिळवले होते.

कारकिर्द

मिशेल सँटनर असल्याने एजाज पटेल याला न्यूझीलंडकडून उशिराने संधी मिळाली. मात्र मिळालेल्या संधीचेही त्याने सोने केले. त्याने आतापर्यंत 11 कसोटी सामने खेळले असून यात 43 बळी मिळवले आहेत. तसेच 7 टी-20 सामनेही त्याने खेळले असून यात त्याच्या नावापुढे 11 बळींची नोंद आहे.