
गुरुवारी संध्याकाळी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा शिवतीर्थावर पार पडणार आहे. मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शपथ घेणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येकी दोन नेते आज शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज शपथ घेणाऱ्या नेत्यांची नावे निश्चित झाली आहे.
जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे दोघेजण शपथ घेणार आहेत. स्वत: जयंत पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. जयंत पाटील यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही आज शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ‘मी आज शपथ घेणार नाही’ असे स्पष्ट शब्दात सांगितले. उरलेल्या मंत्र्यांचे शपथविधी हे विश्वासदर्शक ठराव पारीत झाल्यानंतर आणि विधानसभा अध्यक्षांची निवड झाल्यानंतर होतील असे अजित पवार यांनी सांगितले. आपण शपथविधीला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सुप्रिया सुळे यांच्यासोबत आपण शिवतीर्थावर जाणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितले.
माध्यमांच्या प्रतिनिधींनी शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथून निघालेल्या जयंत पाटील यांना अजित पवारांबाबत प्रश्न विचारले. अजित पवार हे उपमुख्यमंत्री होणार का, ते केव्हा शपथ घेणार ? असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. या प्रश्नांना उत्तर देताना जयंत पाटील यांनी याबाबतचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निर्णय घेतील असे सांगितले.






























































