पुरावा नष्ट करण्यासाठी राफेलच्या फाईलची चोरी, अजित पवार यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ajit-pawar-in-speech

सामना प्रतिनिधी । अलिबाग

राफेलच्या फाईल चोरीला कशा जाऊ शकतात, 650 कोटींची राफेल विमाने 1600 कोटींना दिल्याचा पुरावा नष्ट करण्याचा हा एक डाव असल्याची टीका करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच जो मुलगा आई वडिलांचे ऐकत नाही तो लोकांचे काम कसे करेल असा टोला अजित पवार यांनी सुजय विखे पाटील यांना लगावला आहे.

मावळ लोकसभा मतदार संघातून अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे संभाव्य उमेदवार आहेत. त्या अनुषंगाने शेकापच्या वतीने पनवेल येथे जेष्ठ नागरिक हॉलमध्ये आढावा बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी अजित पवार यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले. अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले की, राष्ट्रवादी आणि शेकापचे विचार काही वेगळे नाहीत. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत. तसेच शेतकरी कामगार पक्ष हा शब्दाला जागणारा पक्ष आहे.

यावेळी अजित पवार यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. “एवढी सुरक्षा व्यवस्था असताना राफेलची फाईल चोरीला गेली कशी” असा सवालही त्यांनी यावेळी विचारला. या बैठकीला आमदार बाळाराम पाटील तसेच शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.