अध्यक्षांचा कल मान्य नाही, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम; विरोधकांच्या सभात्यागावर अजित पवारांची प्रतिक्रिया

जोडे मारण्याची कृती ज्या सदस्यांनी केली त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते आणि वेगळ्या प्रकारचा अंकुश सदस्यांवर होईल अशी अपेक्षा होती. आम्ही हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला मात्र विधानसभा अध्यक्षांचा कल असा दिसला की, दिवसाच्या शेवटी याप्रकरणी निकाल द्यायचा हे आम्हाला अजिबात मान्य नाही ते आताच सांगितले पाहिजे या भूमिकेवर आम्ही ठाम राहिलो मात्र अध्यक्ष निर्णय जाहीर करत नसल्याने सभात्याग केला असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

महाराष्ट्राला संस्कृती, परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गजांनी या राज्याचे नेतृत्व केले आहे. अशा दिग्गज नेत्यांचे पुतळे या परिसरात आहेत त्याच परिसरात जोडे मारण्याची घटना घडली त्याचा तीव्र शब्दात निषेध केल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून महाविकास आघाडीच्या आमदारांनी केला निषेध

राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याच्या घटनेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांची गटनेते व विरोधी पक्षनेते म्हणून भेट घेतली. त्यावेळी कुठल्याच राष्ट्रीय नेत्यांच्या बाबतीत अशी घटना घडता कामा नये. असे कोण करत असेल तर त्यांना निलंबित केले पाहिजे शिवाय सभागृहात आमच्याकडून कुणी अपशब्द वापरले असतील तर त्यांच्यावरही कारवाई करा अशी भूमिका मांडली. ही माहिती त्यांनी ऐकून घेतले आणि आज सकाळी अधिवेशन सुरू होताच निर्णय घेतो असे आश्वासन दिले, असेही अजित पवार म्हणाले.

अजित पवार सरकारवर संतापले

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अस्मितेचा विषय आहे. यावर्षी सप्टेबर महिन्यात मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सवी वर्ष सुरु झाले आहे. हे अमृत महोत्सवी वर्ष संपायला अवघे पाच महिने राहिले तरी सरकार या अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासंदर्भात गंभीर नाही. मराठवाडा आणि मराठवाड्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाविषयी सरकारची अनास्था आहे, त्यांना यावषयी काही देणे-घेणे दिसत नाही. हे अमृतमहोत्सवी वर्षे साजरे करण्याविषयी सरकारकडून कोणत्याही हालचाली दिसत नाहीत, तरी सरकारने या विषयी आपली भूमिका तातडीने स्पष्ट करावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

मराठवाडा मुक्तीसंग्राम लढा हा सर्वांच्या अस्मितेचा विषय आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. सप्टेंबर महिन्यात या अमृतमहोत्सवी वर्षाची सुरुवात झाली. आता हे वर्ष संपायला अवघे पाच महिने राहिले आहेत. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे महोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची मागणी आम्ही सर्वांनी केली होती. याविषयी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सुध्दा हा विषय मी मांडला होता. मात्र अजूनही सरकारकडून या विषयी कोणत्याही हालचाली सुरु नाहीत. मराठवाडा मुक्तीसंग्राम साजरा करण्याविषयी साधा प्रस्तावसुध्दा सरकारच्यावतीने सभागृहात आणला नाही. सरकार यानिमित्त काय कार्यक्रम साजरे करणार आहे ? त्याचे नियोजन काय ? हे सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले नाही याबाबत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.