
येथील आजरा साखर कारखान्यातील बेअरिंग चोरी प्रकरणाचा अखेर छडा लागला असून, या चोरीप्रकरणी कारखान्याच्या तत्कालीन कार्यकारी संचालकासह इतर चार अधिकारी आणि क्रॅप ठेकेदारावर गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आत्ता अटक केलेल्या तत्कालीन कार्यकारी संचालकानेच पोलिसांत फिर्याद दिली होती. दरम्यान, आजरा साखर कारखान्यातील या बहुचर्चित चोरी प्रकरणाने तीन-चार महिन्यांपासून संपूर्ण तालुका आणि सहकार क्षेत्रास हलवून टाकले होते.
माजी कार्यकारी संचालक प्रकाश रामचंद्र चव्हाण, सुरक्षा अधिकारी भरत गणपती तानवडे, सुरक्षारक्षक मनोहर यशवंत हासबे, स्टोअरकीपर दिनकर बाबूराव हासबे यांच्यासह तत्कालीन क्रॅप ठेकेदाराला अटक केली आहे.
आर्थिक डबघाईमुळे आजरा कारखान्याला कोल्हापूर जिल्हा बँकेने सील ठोकले होते. अशातच टिपेला गेलेला संचालकांमधील धुमसता संघर्ष आणि लगेचच आलेल्या कोरोनामुळे कारखान्याच्या मालमत्तेकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. ही स्थिती लक्षात घेत काहींनी येथील लाखो रुपये किमतीच्या सहा बेअरिंग लंपास केल्याचे फार उशिरा समजले. कारखाना बंद असण्याच्या 17 फेब्रुवारी 2019 ते 26 जुलै 2021 या कालावधीत हा प्रकार घडून गेल्याचे सांगण्यात आले. कारखान्याच्या सुरक्षा विभागासह इतर प्रमुख अधिकाऱयांनी क्रॅप ठेकेदाराला हाताशी धरून ही चोरी केली; पण कारखाना स्वबळावर चालविण्याच्या हालचाली सुरू झाल्यावर येथील सहा बेअरिंग चोरीला गेल्याचे उघड झाले.
तेव्हापासून हे प्रकरण गाजत होते. तत्कालीन संचालक मंडळींच्या सहभागाशिवाय अशी चोरी अशक्य असल्याचे काहीजण छातीठोकपणे सांगत होते, तर काही संताप व्यक्त करीत होते. या पार्श्वभूमीवर कारखाना व्यवस्थापनाने या प्रकरणाबाबत आधी आजरा पोलिसांत फिर्याद दिली. विशेष म्हणजे, आता अटक झालेला माजी कार्यकारी संचालक प्रकाश चव्हाण यानेच ही फिर्याद दिली आहे. याबाबत स्वतंत्र चौकशी समिती नेमली गेली. त्यानुसार कारखाना बंदकाळात कार्यरत तत्कालीन 34 अधिकारी-कर्मचाऱयांवर समितीने चोरीचा ठपका ठेवला. त्यानंतर पोलिसांनी तब्बल 60 जणांची याप्रकरणी चौकशी केली. त्यानंतर वरील पाचजणांना अटक करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक सुनील हारगुडे यांनी सांगितले.
गेले तीन महिने गाजत असलेल्या आजरा साखर कारखान्यातील बेअरिंगचोरी प्रकरणाचा अखेर छडा लागला असल्याने तालुकवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे.


























































