बनावट कागदपत्रांद्वारे गहाण ठेवलेल्या जमिनीवर घेतले कर्ज, अकोल्यातील उद्योजकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका बँकेकडे जमीन गहाण असताना बनावट कागदपत्रे तयार करून पतसंस्थेकडून लाखोंचे कर्ज घेणाऱया अकोले येथील उद्योजकाला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या उद्योजकाची पत्नी आणि बनावट कागदपत्रे तयार करणारा तलाठी फरार झाला आहे.

प्रवीण विलास देशमुख (वय 42, रा. नवलेवाडी, ता. अकोले) असे अटक करण्यात आलेल्या उद्योजकाचे नाव असून, त्याची पत्नी आणि तलाठी गुलाब विठोबा बारामते (रा. धुमाळवाडी, ता. अकोले) हे दोघे फरार आहेत. प्रवीण देशमुख याने अकोले तालुक्यातील औरंगपूर येथील मिळकत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेकडे 2013 साली गहाण ठेवली आहे. तरीदेखील आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून, सरकारी दप्तरात फेरफार केला. ही जमीन कोणाकडे गहाण नाही, असे खोटे भासवून संग्राम पतसंस्थेकडून 80 लाखांचे कर्ज मिळविले. ही घटना 2016 साली घडली होती.

याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात संग्राम पतसंस्थेचे मॅनेजर उमेश सुखदेव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तब्बल चार वर्षे या गुह्याचा तपास थंडावलेला होता. पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्याकडे या गुह्याचा तपास आला असता, त्यांनी कारवाई करीत उद्योजक प्रवीण देशमुख याला अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.