
कोरोनामुळे सध्या शूटिंग बंद आहे. इंडस्ट्रीतील हातावर पोट असलेल्या कलाकार, तंत्रज्ञ, डान्सर आणि स्पॉट बॉईज यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशाच 3600 बॅकग्राऊंड डान्सर्सच्या मदतीसाठी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सरसावला आहे. या डान्सर्सना महिनाभराचे रेशन कीट अक्षय देणार असल्याची माहिती कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी दिली. नुकताच गणेश आचार्य यांचा 50वा वाढदिवस साजरा झाला.
अक्षयने त्यांना शुभेच्छा देताना वाढदिवसाची काय भेट देऊ, असे गणेश आचार्य यांना विचारले. त्यावर त्यांनी 1600 ज्युनियर कोरिओग्राफर, वयोवृद्ध डान्सर आणि 2 हजार बॅकग्राऊंड डान्सर यांना मदत करशील का, अशी विनंती केली. अक्षयने क्षणाचाही विलंब न लावता मदतीसाठी आपला होकार कळवला आहे. त्यानुसार गणेश आचार्य फाउंडेशनला अक्षय मदत करणार आहे. हे 3600 डान्सर आणि कोरिओग्राफर या फाउंडेशनचे मेंबर आहेत. पैसे किंवा महिनाभराचे रेशन कीट यापैकी एक डान्सरना निवडता येणार आहे.


























































