
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आळंदी येथील संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे संजीवन समाधी मंदिर वारकरी, भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे बंद करण्यात आलेल्या श्रींच्या समाधीचे स्पर्श दर्शन शनिवार, 2 एप्रिलपासून सकाळी 6 वाजल्यापासून भाविकांना घेता येणार आहे, असे आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी सांगितले.
यावेळी मंदिरातील इतर नित्यनैमित्तिक धार्मिक कार्यक्रमदेखील सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये भाविकांच्या पूजा अभिषेक यांचाही समावेश आहे तसेच गुढीपाडव्यापासून श्रींची ‘चलपादुका पूजा’ही भाविकांना करता येणार आहे. गाभाऱ्यातील श्रींच्या समाधीचे थेट स्पर्श दर्शन देण्याच्या या निर्णयाचे भाविक आणि नागरिकांच्या वतीने माजी नगरसेवक डी. डी. भोसले-पाटील यांनी स्वागत केले आहे. या निर्णयासाठी भोसले-पाटील यांनी सतत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता.
कोरोना काळात शासन निर्णयानुसार, भाविकांना थेट समाधी दर्शन बंद होते. आळंदी देवस्थानने श्रींचे स्पर्श दर्शन व्यवस्था पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या दोन वर्षांचा स्पर्श दर्शनाचा हा दुरावा आता 2 एप्रिलपासून दूर होणार आहे. यामुळे आळंदीतील नागरिक, भाविक, व्यावसायिक, मंदिर परिसरातील व्यापारी यांच्यात समाधानाचे वातावरण असून या निर्णयामुळे दळणवळण वाढून झालेले अर्थी नुकसान भरून येणार नसले, तरी रोजीरोटीसाठीची उलाढाल वाढणार आहे. यामुळे परिवारात आनंदाचे वातावरण आहे, असे मंदिराचे विश्वस्त योगेश देसाई यांनी सांगितले. मंदिर व्यवस्थापनाच्या या निर्णयाचे भाविकांनीही स्वागत केले आहे. भाविकांनी मंदिर व परिसरात गर्दी न करता कोरोनाचे काळातील सूचना, आदेश, मास्कचा वापर करावा, असे आवाहन देसाई यांनी केले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या निर्णयाने श्रींचे स्पर्श दर्शनाचा लाभ भाविकांना मिळणार आहे. मंदिरातदेखील कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना सुलभ देवदर्शन देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
ऑनलाईन दर्शनव्यवस्थेचे आवाहन
दुपारी श्रींचे उटी दर्शन परंपरेने होणार आहे. आळंदीतील परंपरेनुसार दरवर्षी गुढी पाडव्याला श्रींच्या संजीवन समाधीला चंदन उटी व चंदन लेप लावण्याचा विशेष कार्यक्रम होतो. यावेळी श्रींचे उटीतील वैभवी दर्शन लक्षवेधी असते. भाविकही उटी दर्शनास मंदिरात गर्दी करतात. यावर्षी अलंकापुरीत माऊलींच्या संजीवन समाधीचे स्पर्श दर्शन वारकरी, भक्तांना होणार असले , तरीही करोना महामारीचे संकट अद्यापही पूर्णपणे टळलेले नाही. त्यामुळे हे स्पर्श दर्शन वृद्ध, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, लहान बालक यांच्याकरिता आळंदी देवस्थान कमिटीने ऑनलाइन दर्शन व्यवस्था सुरू केली आहे. या सेवासुविधेचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापक माऊली वीर यांनी केले आहे.



























































