
सामना प्रतिनिधी । अलिबाग
खारभूमी विभागाचे कार्यकारी अभियंता यांचा पूर्व नियोजित अलिबाग येथे पाहणी दौरा असताना देखील उपविभागीय अभियंता कार्यालयात हजर नसल्याचे दिसताच कार्यकारी अभियंता यांनी अधिकाऱ्याचे दालन सील केले. त्यामुळे खारभूमी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यामुळे कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार याची चर्चा अलिबागमध्ये सुरू आहे.
अलिबाग शहरातील एमआयडीसी कार्यालयासमोर खारभूमी विकास उपविभागीय अधिकारी कार्यालय आहे. या कार्यालयात एस. जे. शिरसाठ यांच्याकडे उपविभागीय अभियंता म्हणून पदभार आहे. शुक्रवारी खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक भदाणे हे अलिबाग येथे पूर्वनियोजित पाहणी दौऱ्यासाठी आले होते. याबाबत अलिबाग कार्यालयाला तशी सूचनाही दिली होती. त्यानुसार भदाणे यांनी अलिबागमधील खारभूमी विकास उपविभाग कार्यालयाला भेट दिली. मात्र कार्यालयात उपविभागीय अधिकारी शिरसाठ हे कार्यालयात हजर नव्हते. कार्यालयात फक्त एका शिपायाशिवाय कोणीच नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या भदाणे यांनी शिरसाठ यांचे कार्यालय व आतील खोलीचा दरवाजा सील करून निघून गेले. कार्यकारी अभियंता भदाणे यांच्या भेटीने व कार्यालय सील घटनेने कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.
दरम्यान, अलिबाग तालुक्यातील खारभूमी जमिनीबाबत अनास्था असताना अनेकवेळा अलिबाग कार्यालयातील अधिकारी गैहजर असतात. नेहमी शेतकऱ्यांना येणारा अनुभव शुक्रवारी जिल्हा कार्यकारी अभियंता यांना आल्याने आता तरी शिरसाठ कार्यालयात हजर राहतील का ? याबाबत चर्चा रंगली आहे.





























































