
अलिबाग-वडखळ मार्ग लवकरच खड्डेमुक्त होणार आहे. रस्ते संघर्ष समितीच्या सदस्यांनी आज राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयावर धडक देत दुरवस्था झालेल्या रस्त्यावरून अधिकाऱ्यांना फैलावर धरले. इतकेच नाहीतर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. यानंतर ताळ्यावर आलेल्या प्रशासनाने उद्यापासूनच खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात करू असे आश्वासन दिले. त्यामुळे अलिबाग, नागाव, काशीद तसेच मुरुडमध्ये येणाऱ्या हजारो पर्यटकांसह प्रवाशांचा कंबरतोड प्रवास लवकरच थांबणार आहे.
अलिबाग-वडखळ राष्ट्रीय महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. मार्गावर ठिकठिकाणी छोटेमोठे खड्डे पडले असून मार्गावरून वाहन चाल वताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून अनेकदा लहानमोठे अपघात होत असतात. मात्र मार्गाच्या डागडुजीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष धुमसत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या अलिबाग तालुका रस्ते संघर्ष समितीने पेण येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक दिली. यानंतर अलिबाग-वडखळ मार्गावरील खड्डे भरण्याचे काम बुधवारपासून सुरू करण्यात येणार असल्याची लेखी हमी अधिकाऱ्यांनी दिली आहे. यावेळी अलिबाग नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अॅड. मानसी म्हात्रे, अॅड. प्रवीण ठाकूर, निखिल मयेकर, विकास पिंपळे, अॅड. रत्नाकर पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
चौपदरीकरणाचा प्रस्ताव गुंडाळला
अलिबाग-पेण मार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी आला होता. प्रकल्पाला येणारा खर्च परवडत नसल्याच्या कारणावरून तो गुंडाळण्यात आला आहे. अलिबाग-वडखळ मार्गावरील पिंपळभाट, राऊतवाडी, वाडगाव फाटा, खंडाळा, तळवली, मैनूशेटचा वाडा, तीनवीरा, चरी फाटा, पेझारी पोलीस चौकी, पोयनाड, पांडबादेवी येथे एक ते दीड फुटांचे खड्डे पडले आहेत.