पोलिसांच्या मेगा टाऊनशीपचा मार्ग मोकळा, स्वस्तात मस्त घर मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बहुप्रतीक्षित बृहन्मुंबई पोलीस मेगा टाऊनशीप खालापूरच्या वायाळ येथे उभी राहण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. टाऊनशीपसाठी आवश्यक त्या परवानग्या मिळाल्याने आता पोलिसांना स्वस्तात मस्त घर उपलब्ध होणार आहे.

खालापूर येथे पोलिसांसाठी मोठी टाऊनशीप उभी राहणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ही टाऊनशीप उभी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र सरकारी पातळीवर चार वेळा प्लॅनिंग अ‍ॅथॉरिटी बदलण्यात आल्या. शिवाय मध्येच कोविडमुळे दोन वर्षे वाया गेल्याने टाऊनशीप उभारण्याच्या कामाची गती थोडी मंदावली होती, पण आता मात्र या कामाने वेग पकडला आहे. सद्यस्थितीत असलेल्या एमएसआरटीसी या प्लॅनिंग अ‍ॅथॉरिटीकडून टाऊनशीपसाठी आवश्यक असलेल्या परवानग्या देण्यात आल्या आहेत. यामुळे लवकरच भूमिपूजन करून टाऊनशीप उभारणीचे काम सुरू होईल असे बृहन्मुंबई पोलीस को-ऑपरेटिव हौसिंग सोसायटीच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

20 ते 22 लाखांत पोलीस कर्मचाऱ्यांना दोन बीएचकेचे घर मिळणार असल्याने पोलीस कुटुंबीयांचे हक्काच्या प्रशस्त घरात राहण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना हक्काचे प्रशस्त घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच भूमिपूजन करून टाऊनशीपच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल. शिवडी-न्हावाशेवा सिलिंकमुळे अवघ्या 45 मिनिटांत पोलिसांना मुंबईतून आपल्या घरी जाता येणार आहे- प्रताप दिघावकर, निवृत्त आयपीएस

पाच पर्षांत चार प्लॅनिंग अ‍ॅथॉरिटी बदलल्या

वर्ष 2014/15 रोजी या टाऊनशीपसाठी एमएमआरडीएला प्लॅनिंग अ‍ॅथॉरिटी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर वर्ष 2016 मध्ये सिडकोला प्लॅनिंग अ‍ॅथॉरिटी नेमण्यात आले. त्यानंतर हा प्रकल्प सिडकोच्या नयना क्षेत्रात आला, पण हा प्रकल्प महामार्गालगत येत असल्याने वर्ष 2018 रोजी एमएसआरटीसीची प्लॅनिंग अ‍ॅथॉरिटी म्हणून नियुक्ती झाली होती. दरम्यान, मधली दोन वर्षे कोविडमध्ये गेली. अखेर एमएसआरटीसीने टाऊनशीपसाठी आवश्यक परवानगी मंजूर केली.