
बंदुकीची गोळी हवेत झाडून दोन युवकांनी युवतीला पळवून नेल्याची खळबळजनक घटना अमरावती शहरातल्या बालाजी प्लॉट येथे सोमवारी मध्यरात्रीनंतर घडली. या प्रकरणी सध्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून युवती व दोन युवकांचा अद्यापही शोध लागलेला नाही. नागपुरात राहणारी तरुणी तिच्या मोठ्या बहिणीच्या बालाजी प्लॉट येथील घरी एका कार्यक्रमाला आली होती.
रात्री दोन तरुण दुचाकीवर तेथे आले. तरुणीला जबरदस्तीने दुचाकीवर बसविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नातेवाईकांनी विरोध केल्यावर एका तरुणाने कमरेला लटकविलेले पिस्तुल काढून हवेत दोन गोळ्या झाडल्या. पिस्तुलाच्या धाकावर तरुणीला बळजबरीने गाडीवर बसवले व पळवून नेले. पोलिसांना माहिती मिळताच संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्यात आली.
नाकाबंदी दरम्यान नांदगाव पेठ टोलनाक्यावर दोन मुलांना अटक करण्यात आली. प्रफुल्ल दमाये (20) आणि प्रमेश आटपाका (32) अशी त्यांची नावे असून दोघेही नागपूरचे रहिवाशी आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हवेत गोळीबार करणाऱ्या मुलाचे या मुलीशी प्रेमसंबंध आहेत. नागपूरहून चार मित्र आले होते. दोन मित्र दुचाकीने बालाजी प्लॉटमध्ये आले. अन्य दोन नांदगाव पेठ टोलनाक्यावर थांबले.
ज्या मुलाचे या मुलीशी प्रेमसंबंध होते, त्या मुलाने हवेत गोळीबार करत युवतीला घेऊन पळ काढला. पोलीस तरुणीसह दोन्ही तरुणांचा कसून शोध घेत आहेत. बालाजी प्लॉट परिसरासह संपर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे.




























































