
>> रमाकांत पाटील
अखंड हिंदुस्थानात हिंदुत्वाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे तेजस्वी व ओजस्वी विचार हे तळागळामध्ये व सर्वसामान्यांमध्ये गेले पाहिजेत या भूमिकेतून शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख शिवाजी कुलकर्णी यांनी आपल्या नेतृत्वाच्या विचारांचा जागर करण्यासाठी अंबाजोगाई शहरात हनुमान नगर भागात शिवसेनाप्रमुख यांचे स्मारक उभे केले. तसेच त्या ठिकाणी शिवसेनाप्रमुखांचा अर्धाकृती पुतळा उभा केला आहे. शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनी म्हणजे 17 नोव्हेंबर रोजी या स्मारकाला अंबाजोगाई शहर आणि परिसरातील असंख्य ठाकरे प्रेमींनी अभिवादन करून उपक्रमाचे व शिवाजी कुलकर्णी यांचे कौतुक केले.
शिवसेनाप्रमुखांनी गेली 50 वर्षे महाराष्ट्रात हिंदुत्वाचा विचार तळागळामध्ये पोहचविण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुखांचा शब्द म्हणजे प्रमाण होते आणि आजही त्यांच्या नावाचा व विचारांचा दबदबा आहे. शिवसेनाप्रमुखांची ही एक उर्जा आहे. जी करोडो शिवसैनिकांना बळ देते. 50 वर्षांच्या राजकीय प्रवासात अनेकांना मोठे करण्याचे काम बाळासाहेबांनी केले. सत्तेचे वाटप सदैव कार्यकर्त्यांना व सहकाऱ्यांना केले. दिलदार मनाचा खरा राजा म्हणून ठाकरेंची ओळख होती. अशा या नेतृत्वाला मुकल्याची खंत महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील तमाम हिंदुत्ववादी विचारांच्या कार्यकर्त्यांना आहे.
अंबाजोगाई शहरातील हनुमान नगर येथे शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख शिवाजी कुलकर्णी यांनी स्वखर्चातून शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभे करण्याचा निर्णय घेतला. त्या ठिकाणी साधारणतः 1100 स्वे.फूट एवढी जागा स्मारकाला देण्यात आली. त्या ठिकाणी शिवसेनाप्रमुखांचा पुतळा जयपूर या ठिकाणाी ऑर्डर देऊन बनविण्यात आला. हा पुतळा स्मारकामध्ये सुरूवातीला ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर स्मारकात वाचनालय, शिवसेनाप्रमुख यांचे दुर्मिळ छायाचित्र असणार आहेत. शिवाय शिवसेनेच्या कार्यालयाची प्रतिकृती असलेला शिवसेना भवनाचा मोठा फोटो मुंबईवरून मागविण्यात आला आहे. या परिसरात येणाऱ्या तमाम शिवसेनाप्रमुख प्रेमी कार्यकत्र्यांना शिवसेनाप्रमुखांच्या आठवणीमध्ये पुन्हा एकदा घेऊन जाण्याचा हा प्रयत्न शिवाजी कुलकर्णी यांनी केलेला आहे. शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनाच्या दिवशी हे स्मारक खुले करण्यात आले.
त्याचे रितसर उद्घाटन झालेले नसले तरी या स्मारकाला भेट देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनी असंख्य शिवसैनिकांनी त्या ठिकाणी जाऊन अभिवादन केले. शिवाजी कुलकर्णी राबविलेल्या उपक्रमाचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. येणाऱ्या काळात या स्मारकाचे उद्घाटन शिवसेनेच्या मान्यवर नेत्याच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती शिवाजी कुलकर्णी यांनी बोलताना दिला.





























































