
अमेरिकेत राहणाऱया जवळपास 42 लाख हिंदुस्थानी-अमेरिकन नागरिकांपैकी 6.5 टक्के लोक दारिद्रय़रेषेखालील जीवन जगत आहेत. कोरोना महामारीमुळे या कुटुंबांच्या वाटय़ाला आणखी हलाखीचे दिवस येण्याची शक्यता आहे. बंगाली व पंजाबी भाषा बोलणाऱया नागरिकांमध्ये गरिबीचे प्रमाण अधिक आहे. अमेरिकेतील गरीब लोकांच्या सर्वेक्षणातून ही वस्तुस्थिती उजेडात आली आहे.
जॉन्स हॉपकिन्सच्या पॉल नाइट्ज स्कूल ऑफ ऍडव्हान्स इंटरनॅशनल स्टडीजचे देवेश कपूर आणि जशन बाजवात यांनी या सर्वेक्षणाचे नेतृत्व केले. गुरुवारी पार पडलेल्या ’इंडिस्पोरा फिलेंथ्रोप समिट’मध्ये सर्वेक्षणाचा अहवाल प्रकाशित करण्यात आला.
या महामारीत सर्वात जास्त वंचित हिंदुस्थानी अमेरिकन नागरिकांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. त्यांच्या वाटय़ाला आलेल्या गरीबीकडे लक्ष वेधणे आणि गरिबी निर्मुलनासाठी व्यापक जनजागृती करणे हा या सर्वेक्षणामागील हेतू असल्याचे ’इंडिस्पोरा’चे संस्थापक एम. आर. रंगास्वामी यांनी सांगितले.
– 20 टक्के हिंदुस्थानींकडे अमेरिकेचे नागरिकत्वच नाही
अमेरिकेत कित्येक वर्षांपासून वास्तव करीत असलेल्या जवळपास 20 टक्के हिंदुस्थानींना अजून अमेरिकेचे नागरिकत्वच मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना तेथील सरकारी योजनांचा लाभ घेता आलेला नाही. तसेच एकूण हिंदुस्थानींपैकी एक तृतीयांश नागरिक हे कामगार वर्गात मोडत नसल्याचेही सर्वेक्षणातून उघडकीस आले आहे.

























































