अमिताभ बच्चन यांना केबीसीच्या सेटवर दुखापत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना नुकतीच ‘केबीसी 14’ या रिऍलिटी शोच्या शूटिंगदरम्यान दुखापत झाली. पायाची नस कापली गेल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्तस्राव थांबवण्यासाठी त्यांच्या जखमेला टाके घालण्यात आले आहेत. याबाबत स्वतः अमिताभ बच्चन यांनी आज ब्लॉगमधून माहिती दिली. तसेच आपण पूर्णपणे बरे आहोत. काळजी करण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी सांगितले.

बिग बींनी ब्लॉगमध्ये दुखापत कशी झाली ते सविस्तर लिहिलंय. सेटवर बाहेर निघालेला एक धातूचा तुकडा त्यांच्या पायाला लागला. त्यामुळे त्यांच्या पायाची नस कापली गेली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. अमिताभ यांची प्रकृती आता चांगली आहे. मात्र डॉक्टरांनी त्यांना खबरदारी घेण्यास सांगितले आहे. पायावर जोर देऊ नये. पायाची जास्त हालचाल करू नये. ट्रेडमिलवरही वॉक करू नका, अशा सूचना डॉक्टरांनी केल्या आहेत. केबीसीच्या सेटवर खूप काळजी घेतली जात असल्याचे अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये लिहिलंय. अमिताभ यांचा 80 वा वाढदिवस नुकताच साजरा झाला.