
तुमची कंपनी दिवाळखोरीत गेली आहे. कंपनीवर प्रचंड कर्ज असून कर्जवसुलीसाठी दिवाळखोरी कायद्याअंतर्गत करण्यात येणाऱया कारवाईत सहकार्य करा असे म्हणत रिलायन्स कम्युनिकेशन्सचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्यासह चार संचालकांनी दिलेला राजीनामा कंपनीच्या कर्जदात्यांनी अमान्य केला आहे. आरकॉमच्या कर्जदात्यांची एक बैठक 20 नोव्हेंबर रोजी झाली होती. या बैठकीत अनिल अंबानी आणि इतर चार संचालकांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला अशी माहिती कर्जदात्यांच्या समितीने बीएसईला दिली होती.
11 वर्षांत कंपनीची संपत्ती प्रचंड घटली
गेल्या 11 वर्षांत रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या संपत्तीत प्रचंड घट झाली आहे. ही कंपनी सध्या दिवाळखोरी कायद्याच्या प्रक्रियेतून जात आहे. 2008 मध्ये कंपनीकडे 42 अब्ज डॉलर इतकी संपत्ती होती. 2019 पर्यंत संपत्तीत घट होऊन ती 5230 दशलक्ष डॉलर म्हणजेच 3651 कोटी रुपये इतकी झाली.
कंपनीला 30 हजार कोटींचे नुकसान
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीला तब्बल 30 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. व्होडाफोन-आयडियाला झालेल्या नुकसानीनंतरचे हे दुसरे सर्वात मोठे नुकसान आहे. हे नुकसान कंपनीने जाहीर केल्यानंतर आरकॉमचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्यासह छाया विरानी, रायना करानी, मंजरी काकेर आणि सुरेश रंगाचर या चार संचालकांनीही राजीनामा दिला होता.


























































