मविआ सरकार पाडण्याची ऑफर देणाऱ्या भाजप नेत्याची व्हिडीओ क्लिप माझ्याकडे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपने ऑफर दिली होती. त्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा दूत माझ्याकडे आला होता. त्याची ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप माझ्याकडे आहे. ऑण्टिलिया स्फोटक प्रकरण मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांनी रचले होते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज केला.

भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याचा दूत माझ्याकडे आला आणि मला कारवाईपासून संरक्षण देण्याची खात्री दिली. त्या मोबदल्यात चार मुद्दय़ांचं एक शपथपत्र देण्यास सांगितलं. मी जर तसं केलं असतं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील मविआचं सरकार पडलं असतं, पण मी नकार दिला आणि दुसऱया दिवसापासून माझ्यावर ईडी, सीबीआयची कारवाई सुरू झाली. त्या नेत्याचा ऑफर देतानाचा ऑडिओ आणि व्हिडीओ माझ्याकडे आहे, असे राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी लोकशाही मराठी पॉडकास्ट या कार्यक्रमात बोलताना सांगितले.

परमबीर सिंह यांनी खोटे आरोप करून मला फसवले
परमबीर सिंह यांनी खोटे आरोप करून मला फसवले. 100 कोटींचा आरोप केला, पण चार्जशीट 1 कोटी 71 लाखांची केली. हे आरोप फक्त सरकार पाडण्यासाठी केले होते. ऑण्टिलिया स्फोटक प्रकरणाचा बनावही परमबीर सिंह यांनीच सचिन वाझेला हाताशी धरून रचला होता आणि त्याला पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णयही त्यांचाच होता, असे अनिल देशमुख म्हणाले.

…म्हणून मलिकांना तुरुंगात टाकले
नवाब मलिक हे भाजपच्या विरोधात बोलत होते. त्यामुळे त्यांची जुनी प्रकरणे बाहेर काढून त्यांना तुरुंगात टाकले. मलिक यांना आता दोन-दोन महिन्यांची बेल मिळत आहे. त्यांनी तोंड उघडले तर ते त्यांना अजून त्रास देतील म्हणून मलिक शांत आहेत, असे देशमुख म्हणाले.

अजितदादांना पवारांचे राजकारण संपविण्याची सुपारी
अजित पवारांना भाजपने शरद पवारांचे राजकारण संपविण्याची सुपारी दिली. आता भाजप सांगेल तेच त्यांना करावे लागेल. राजकारणात विरोधकांना गाफील ठेवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात, असे देशमुख म्हणाले.