
>>प्रा. अनिल कवठेकर
काही गाणी फक्त ऐकली तरी त्या स्वरात आपण हरवून जातो. पण काही गाणी पाहताना आणि ती ऐकताना त्याचा वेगळा सौंदर्यानुभव असतो. कारण ती गाणी त्या शब्दांच्या प्रतिमांना दृश्याच्या अत्तराचे सुगंध देऊन पाहणाऱयाला सुगंधी सौंदर्याने भारावून टाकतात. स्वरशब्दांबरोबर येणारे अप्रतिम सादरीकरण त्याच्या खोलवर अर्थपूर्णतेने प्रेक्षकाला मंत्रमुग्ध करते. अशा काही गाण्यांपैकी ‘गाईड’ या चित्रपटातील ‘आज फिर जीने की तमन्ना है…
हे गाणे मला नेहमीच पडद्यावर पाहण्याची भुरळ घालते. कारण ते त्या कथानकाला, नायिकेच्या स्वच्छंदी वागण्याला इतिहासाचा संदर्भ देत अधिकाधिक अर्थपूर्ण करते.
चित्रपटातल्या गाण्याला त्या चित्रपटाच्या पटकथेचा संदर्भ असतो; पण काही कवी ते गीत लिहिताना संदर्भाचा कोश फाडून त्या गाण्याला साहित्याच्या अक्षर सौंदर्यात नेऊन ठेवतात… आणि मग ते कोश फाडून बाहेर पडलेले गाण्याचे फुलपाखरू प्रेक्षकांच्या मनाभोवती भिरभिरू लागते. तेव्हा त्या फुलपाखराला स्पर्श करण्याचा मोह आपल्याला आवरत नाही. मीही त्या फुलपाखराला स्पर्श करण्यासाठी, त्याच्या सौंदर्याला जवळून न्याहाळायला लागलो आणि ते गाणे माझ्याशी बोलू लागले. स्वरशब्दांचे अर्थ खोलू लागले….
गाणे जेव्हा पडद्यावर सुरू होते तेव्हा गवत भरलेल्या ट्रकमधून रोझी (वहिदा रहमान) आणि राजू गाईड (देव आनंद) जात आहेत. त्या चालत्या ट्रकमधून रोझी रस्त्याच्या कडेने पाणी भरायला निघालेल्या महिलेच्या डोक्यावरचा माठ झटकन उचलून घेते. तो स्वतःच्या डोक्यावर ठेवते. आनंदाने हसते, खिदळते. ती खूप आनंदात आहे. तिने आकाशी रंगाची साडी नेसली आहे. तिचे सर्वांग एका वेगळ्या आनंदाने भरून आलेले आहे जे तिच्या हसण्यातून व हालचालीतून दिसते. तिच्या हालचालीमध्ये एक वेग आहे. त्या वेगाला एक ताल आहे. त्या तालाला गती आहे. fितच्या कृतीतून दिसत असते. राजू गाईड तिला म्हणतो, ‘कल तक आप लगती थी चालीस साल की औरत जो जिंदगी की हर खुशी, हर उमंग, हर उम्मीद के बीच कही रास्ते में खो गई है और आज लगती है सोलह साल की लडका,r भोली, नादान, बचपन की शरारत से भरपूर.’’ तिच्या बोलण्यातला अल्लडपणा, ती शरारत आधी दिसते. नंतर येतात त्या अर्थाचा संवाद. जो बोलण्याआधीच आपल्या नजरेने पकडलेला असतो.
रोजी म्हणते, ‘‘जानते हो क्यौं?’’ प्रत्येक स्त्राrच्या मनात असलेली स्वतंत्रपणे जगण्याची भावना, जगण्यातला मुक्तपणा, निर्णय घेण्याची क्षमता हे सगळे अर्थपूर्ण शब्दात मांडणारे गीत सुरू होते. रोझी रस्त्यावरून चालणाऱया स्त्राrच्या डोक्यावरून माठ घेते. काही क्षण आपल्या डोक्यावर ठेवते आणि रस्त्यावर फेकून देते. ट्रक पुढे सरकतो. माठ जीवनाचे प्रतीक आहे. पाणी साठवायचा माठ प्रत्येक वेळी भरताना धुऊन जपून भरावा लागतो. जपून ठेवावा लागतो. त्या मातीच्या भांडय़ाची किंमत फार नाही. तरीही तो जपला जातो. कारण तो स्त्राrचा स्वभाव आहे. नायिका जेव्हा तो माठ रस्त्यावर फेकून देते, तेव्हा ती सुचवते की, मी माझ्या डोक्यावरचा माठ कधीच फेकून दिलाय. स्त्रियांच्या डोक्यावरचे परंपरेचे ओझे तिने फेकून दिलेय. कारण तिला स्वतंत्र व्हायचे आहे. मुक्त व्हायचे आहे. गाणे सुरू होते.
‘‘कांटोसे खीच के ये आंचल…’’
किती सुंदर शब्दांत नायिकेच्या भावना कवीने मांडलेल्या आहेत. एखाद्या स्त्राrचा पदर काटेरी झुडपात अडकला तर ती तो अलगदपणे न घेता खेचून काढते. कारण तिला माहितीये की पदर खेचताना तो पदर फाटणार आहे. तिला ते चालणार आहे. आता तिला त्या बंधनात राहायचे नाही. जीवनाच्या काटेरी झुडपात अडकायचे नाही.
‘‘तोड के बंधन बांधी पायल…’’
पूर्वीच्या काळात स्त्रियांनी पायात पैंजण घालून फिरायला परवानगी नव्हती. स्त्री खूप बंधनात होती. पण इथे रोझी म्हणते की, आता कोणत्याही सामाजिक बंधनात अडकायचे नाही. सगळी बंधने झुगारून मी हिंमत करून पायांमध्ये पैंजण बांधले आहेत.
‘‘कोईना रोके दिल की उडान को
दिल वो चला अ आ आ आ…’’
आता कुणीही माझ्या मनाच्या उड्डाणाला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. कारण ते थांबणारच नाही. ते पहा, ते पहा माझे मन निघालेय दूर. या जाचक परंपरांच्या बंधनाच्या पलीकडे. आज खऱया अर्थाने जगण्याची इच्छा झाली आहे आणि अशा जगण्यात जरी मला मृत्यू आला, तरी मला त्याचे भय नाही. कारण त्या बंदिस्त जगात जिवंतपणी मी अनेक वेळा माझा मृत्यू होताना पाहिलेला आहे. मला त्या मृत्यूची भीती राहिलेली नाहीये. मृत्यूची भीती वाटत नाही तेव्हाच माणूस खऱया अर्थाने जगायला लागतो. मरणासाठी जगणे थांबवणे योग्य नाही पण जगता जगता मरण आले तर ते मात्र आनंदाचे स्वीकारले जाते. पण ते जगणे मात्र मनासारखे असले पाहिजे. असेच काहीसे कवी या ओळीतून सांगत आहे.
दोन्ही बाजूने हिरवीगार झाडी आणि काळ्याभोर डांबरी रस्त्यावरून तो जुनाट ट्रक चाललेला आहे. त्या ट्रकमध्ये असलेल्या गवतावरून रोझी खाली घसरते. ती स्वतःला सावरत नाही. तिचा गाईड, राजू तिला सावरतोय. आनंदात तिला मरणाचे भय उरले नाही. वाळलेल्या गवताची एकेक काडी आयुष्याचा एकेक दिवस जगून, उपभोगून भिरकवल्यासारखी ती काडी भिरकावून देते. जगण्याआधीच तृप्ततेचे भाव तिच्या चेहऱयावर दिसत आहेत.
आता त्यांचा प्रवास उंटावरून सुरू होतो. जो घोडय़ावरच्या प्रवासाइतका सोपा नाही आणि कडवं येते…
‘‘अपने ही बस मे नही मै
दिल है कही, तो हुं कही मैं…’’
उंटावर बसणे अवघड असते. ती उंटावर एका बाजूने बसली आहे. तसे बसणे धोक्याचे आहे. पण तिचे शब्दच सांगतात की, तिचे तिच्या मनावर नियंत्रण राहिलेले नाही. तिचे मन तिच्या हृदयाच्या फांदीवर बसलेले नसून मुक्त आकाशात विहरत आहे. मनाची ही अत्यंत वेगळी स्थिती आहे. त्याला मनाचा गोंधळ म्हणावा की, जगण्यात सापडलेली मौज म्हणावी, हे मांडताना माझेही शब्द उडत आहेत.
‘‘ज्याने क्या पाके मेरी जिंदगी ने
हसकर कहा ह ह हा’’
मला जीवनात नेमके काय प्राप्त झाले आहे हे मला सांगता येत नाही. पण त्याचा स्वीकार करणारे मन मात्र आनंदाने हसत आहे. तिच्या दोन्ही बाजूच्या उंटावर दोघीजणी परंपरेचा घुंगट ओढून बसलेल्या आहेत. मधूनमधून पदर बाजूला सारून तिच्या जगण्यातला आनंद लपून त्या पाहत आहेत. ती जेव्हा त्यांच्यासारखा घुंगट घेते, तेव्हा क्षणभर त्या दोघी त्यांचा घुंगट बाजूला काढून तिच्याकडे पाहतात क्षणभरच. क्षणभर त्या दोघी तिच्यासारखा स्वातंत्र्याचा आनंद घेतात आणि गाणे पुढे सरकते. प्रत्येक वेळी नायिकेला मार्गदर्शन करणारा राजू गाईडचा उंट मागे पडला आहे. राजू त्याला हाकलतोय आणि ती त्याच्यापुढे निघून गेला आहे.
प्रवास करत करत गाणे आपल्याला घेऊन जाते राजस्थानच्या चित्तोडगडावर. नायिकेच्या पाठीमागे विजयस्तंभ दिसतो. तिच्या विजयाचा. त्या इमारतीच्या डाव्या बाजूला नायिका धावते आणि उजव्या बाजूला असलेल्या जागेवर राजपूत स्त्रियांनी जोहार केलेला कुंड क्रीनवर दिसतो. मुक्तपणे जगण्यासाठी पतीची गरज काय असे म्हणणारी बंडखोर नायिकेचे गाणे चित्तोडगडाच्या इतिहासासोबत उलगडत जाते.
‘‘मै वो बाढ या तुफां हुं
कोई बताये मैं कहा हूं…’’
मी आता नदीला आलेला पूर आहे. त्या पुराचे पाणी मनसोक्तपणे हवे तिथे बागडणार आहे. त्याला नियंत्रणात आणणारे कोणीही नाही. बंधनात ठेवणारेही कोणी नाही. मी एक वादळ आहे. अडवणाऱयाला उध्वस्त करणारे. तिच्या संपूर्ण विचारात एक वैचारिक क्रांती झालेली आहे. नाचत नाचत ती त्या जुन्या इमारतीच्या कडेला येते. तेव्हा राजू गाईड तिला मागे जायला सांगतो. तिच्या पडण्याची त्याला आता भीती वाटतेय. या प्रवासात तिला हरवण्याची हलकीशी भीती आहे. कारण रस्ता तिच्यासाठी नवा आहे. सामाजिक परंपरेत कुठेही न बसणारा आहे. म्हणून नवा आहे.
‘‘कल के अंधेरो से निकल के
देखा है आखे मलते–मलते…’’
इथे आपल्याला एक आरसा दिसतो. दोन्ही महल दिसू लागतात. पद्मावती ज्या महालात होती त्या महालात रोझी उभी आहे. किती सूचकतेने इतिहासाचा सुंदर दाखला अप्रत्यक्षपणे दिग्दर्शकाने आपल्यासमोर मांडला आहे. या इतिहासाच्या काळोखातून ती आता बाहेर पडलेली आहे. तिला नुकतीच जाग आली आहे. म्हणून डोळे चोळत ती पाहात आहे. हे कडवं म्हणजे जागे झाल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया आहे. त्या प्रकाशापर्यंत पोहोचण्यासाठी तिच्या डोळ्यांची पण तयारी चाललेली आहे.
‘‘फुल ही फुल जिंदगी बहार है
तय कर लिया हा आ आ…’’
आयुष्य फुलासारखे आहे. फुलाचे आयुष्य किती असते ते आपण जाणतो. त्या सुंदर फुलासारखे जगायला हवे आणि आता रोझीने ठरवलेय की, ती तशीच जगणार आहे.
…आणि इथे गाणे संपते. आपल्या मनामध्ये त्या गाण्यातले चित्रीकरणाचे सौंदर्य रुंजी घालू लागते.
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)






























































