परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचा आणखी एक गुन्हा, व्यावसायिकाकडून दोन कोटी मागितले

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या खंडणी प्रकरणाच्या सुरस कथा समोर आल्या आहेत. मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात परमबीर यांच्याविरोधात बुधवारी खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शुक्रवारी ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यातही त्यांच्याविरोधात भाईंदरमधील व्यावसायिक शरद अग्रवाल यांच्याकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिल्डर श्यामसुंदर अगरवाल यांच्या तक्रारीवरून माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, उपायुक्त अकबर पठाण यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केस मागे घेण्यासाठी आपल्याकडे खंडणी मागितल्याचा दावा अगरवाल यांनी केला आहे.

या प्रकरणानंतर भाईंदर येथे राहणारे व्यावसायिक अग्रवाल यांनीही परमबीर सिंह यांनी दोन कोटींची खंडणी मागितल्याची तक्रार केली. त्यानंतर सिंह यांच्याविरुद्ध कलम 384, 385, 388, 389, 420, 364 ए, 34, 120 बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अग्रवाल यांचा भाऊ शुभम याला ठाणे क्राईम ब्रँचने अटक केली होती. त्याला सोडवायचे असेल तर एक कोटी रुपये देण्याची मागणी परमबीर सिंह यांनी केली.

काही दिवसांनी शरद आणि शुभम या अग्रवाल बंधूंना खोटय़ा प्रकरणांमध्ये अडकवण्याची धमकी देत ही खंडणी दोन कोटींवर नेण्यात आली. याप्रकरणी परमबीर सिंह यांच्यासह यांच्यासह संजय पुनमिया, सुनील जैन, मनोज घोटकर आणि पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले. परमबीर सिंह हे ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना मणेरे हे त्यावेळी ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त होते. सध्या ते मुंबईत कार्यरत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या