लग्नानंतर आठ वर्षं लैंगिक संबंध नाहीत, खासदाराला घटस्फोट मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्नानंतर आठ वर्षं उलटूनही पत्नीसोबत शारीरिक संबंध स्थापन न झाल्याने एका खासदाराला न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला आहे. आठ वर्षं लैंगिक संबंध न ठेवू देणं हे पत्नीने दिलेली क्रूरतेची वागणूक असल्याचं ओडिशा उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

या खासदाराचं नाव अनुभव मोहंती असं आहे. मोहंती हे ओडिसी चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेता आहेत तसंच बिजू जनता दलाचे खासदारही आहेत. अनुभव यांचा विवाह 2014 मध्ये वर्षा प्रियदर्शनीसोबत झाला होता. काही काळातच त्यांच्या लग्नात सर्वकाही आलबेल नसल्याची वृत्तं येऊ लागली. 2016मध्ये अनुभव मोहंतीने वर्षाविरुद्ध खटला दाखल केला. लग्नानंतर दोन वर्षांनंतरही आपल्या पत्नीने आपल्यासोबत लैंगिक संबंध प्रस्थापित केले नसून वैवाहिक जीवनाची सुरुवात होऊ दिली नाही, असा आरोप मोहंती यांनी पत्नी वर्षा हिच्यावर केला.

तर दुसरीकडे वर्षा यांनी आपल्याला अनुभव यांनी मातृत्वाचा आनंद घेण्यापासून वंचित ठेवलं असा आरोप केला. अनुभव यांना दारूचं व्यसन असून त्यांची अनेक प्रेमप्रकरणं आहेत, असा दावाही वर्षा यांनी केला होता. कौटुंबिक न्यायालयाने मोहंती यांची याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्या. अरिंदम सिन्हा आणि न्या. सिबो शंकर मिश्रा यांच्या खंडपीठासमोर त्यांच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर अनुभव मोहंती यांच्या पत्नीने त्यांना शारीरिक सुखापासून वंचित ठेवणं हे क्रौर्य असल्याचं म्हणत त्यांना घटस्फोट मंजूर केला आहे.