
वाढत्या महागाईवरून केंद्रातील मोदी सरकारविरोधात आंदोलन म्हणून नागाव शहरातील चौकांमध्ये पथनाटय़ सादर करणाऱया तरुणाला आसाम पोलिसांनी अटक केली. या तरुणाने मैत्रिणीला सोबत घेऊन भगवान शंकर आणि पार्वतीची भूमिका साकारली होती. मात्र त्याने शंकराची चुकीची वेशभूषा करून धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली.
पेट्रोल-डिझेलची दरवाढ, जीवनावश्यक वस्तूंचे गगनाला भिडलेले भाव याविरोधात जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. जनतेची संतप्त भावना सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी नागाव येथील विरिंची बोरा व करिश्मा या तरुण-तरुणीने शंकर-पार्वतीची भूमिका साकारून पथनाटय़ सादर केले आणि बुलेटवरून शहरभर फेरफटका मारला. यादरम्यान मधेच इंधन संपले आणि त्यांची गाडी कॉलेज चौकातच बंद पडली. यावेळी इंधन दरावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद पाहण्यासाठी शहरातील लोकांनी मोठी गर्दी केली. या गर्दीदेखतच शंकराची भूमिका साकारलेल्या तरुणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बेधडक टीका केली. भाजप सरकारला गोरगरीबांच्या प्रश्नांबाबत काहीही पडलेले नाही. त्यांना फक्त उद्योजकांचे कल्याण करायचेय, असा आरोप शंकराच्या वेशभूषेतील तरुणाने केला. तसेच जनतेलाही रस्त्यावर उतरण्याचे आवाहन त्याने केले.
बजरंग दल, विहिंपने घेतला वेशभूषेवर आक्षेप
शंकर-पार्वतीच्या वेशभूषेतील विरिंची बोरा व करिश्मा या दोघांनी सादर केलेले पथनाटय़ शहरभर चर्चेचा विषय ठरले. त्यानंतर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने दोघांच्या वेशभूषेवर आक्षेप घेतला. विरिंची याने हिंदू सनातन धर्मासोबत छेडछाड केली. हे अत्यंत चुकीचे आहे, असा आक्षेप दोन्ही संघटनांनी घेतला. तसेच आम्ही असे कृत्य खपवून घेणार नाही, असा इशाराही दिला. त्यानंतर पोलिसांनी कलाकारांना ताब्यात घेतले.



























































