गर्दीत लुटमार करण्याच्या तयारीतील टोळी पकडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळी सणानिमित्ताने पुण्यात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करून गर्दीच्या ठिकाणी आणि पीएमपीएल बसमध्ये चोऱ्या करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा यूनिट दोनच्या पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून 3 मोबाइल फोन, एक कोयता, दोन कटर, मिरची पूड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्वारगेट भागात ही कारवाई करण्यात आली.

संतोष उर्फ मॅनेजर शरणाप्पा जाधव (45 रा. मुंढवा), अमित नाना चव्हाण (25 रा. मुंढवा), विनोद बजरंग गायकवाड (27 रा. मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, त्यांच्या साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. यातील जाधव हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याला शहरातून तडीपार करण्यात आले आहे. दिवाळीच्या काळात शहरातील मंडई परिसर, लक्ष्मी रस्ता, पुणे स्टेशन, पुलगेट भागात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होते. अशा गर्दीच्या ठिकाणी चोरट्यांकडून नागरिकांची लुटमार केली जाते. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा यूनिट दोनचे पथक हद्दीत गस्त घालत होते.

या दरम्यान नागरिकांना लुटण्याच्या तयारीत असलेली टोळी स्वारगेट भागात थांबल्याची माहिती अंमलदार मोहसीन शेख यांना मिळाली. यानूसार पथकाने सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत ते नागरिकांना लुटण्याच्या तयारीत असल्याचे कबूल केले. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, यूनिट दोनचे वरिष्ठ निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, अंमलदार शंकर नेवसे, प्रमोद कोकणे, विनोद चव्हाण, नागनाथ राख यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

मोक्कातील फरार आरोपी जेरबंद
खून, खूनाचा प्रयत्नांसह मोक्का गुन्ह्यात फरार असलेल्या आदित्य दिलीप खुडे (25, रा. कात्रज) याला यूनिट दोनच्या पथकाने अटक केली. हद्दीत गस्तीवर असताना अंमलदार नामदेव रेणूसे, विजय पवार यांना मिळालेल्या माहितीनूसार खुडे याला ताब्यात घेण्यात आले.