सत्याचा शोध – विज्ञानोबा, तूच अमुचा सांगाती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>चंद्रसेन टिळेकर

‘विज्ञानाची पोळी खाऊन अध्यात्माची टाळी’ वाजविणारा, एक मागासलेला, अंधश्रद्धाळू देश म्हणून विश्वात आपली अपकीर्ती होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी देव नसतो तर विज्ञान असते आणि तेच आपल्या साथीला, सोबतीला असते, आपल्याला वाचवते याचा प्रकाश आम्हा हिंदुस्थानीयांच्या डोक्यात ज्या दिवशी पडेल तो खरा सूर्योदय म्हणायला हवा.

देशातील चार धामपैकी उत्तराखंडातल्या उत्तरकाशीत असलेल्या बद्रीनाथ धामच्या रस्त्यावर बोगदा खणत असता 41 मजूर तो बोगदा कोसळल्याने तब्बल सतरा दिवस काळकोठडीत अडकल्याप्रमाणे अडकून पडले होते. शेवटी अथक मानवी प्रयत्नांनी व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांची सुटका झाली आणि सर्व देशाने सुटकेचा नि:श्वास टाकला. त्यांची सुटका व्हावी म्हणून देशात कुठे सांघिकरीत्या ‘हनुमान चालिसा’ म्हटल्याचे अथवा लघुरुद्र-महारुद्र किंवा अनुष्ठाने, जप-तप, प्रार्थना झाल्या नाहीत. याबद्दल अल्पसंख्येने का होईना, पण विवेकी देशवासीयांनी आणखी एक सुटकेचा नि:श्वास नक्कीच टाकला. अन्यथा भाविकांनी असल्या देवप्रिय गोष्टी केल्यानेच देवाने संतुष्ट होऊन त्या मजुरांची सुटका केली, अशी घंटा बडवली असती.

नुकत्याच ऑस्ट्रेलियाबरोबर झालेल्या विश्वकप लढतीत लाखोंच्या संख्येने खुद्द स्टेडियममध्ये ‘हनुमान चालिसा’ म्हणूनही आणि देशभर यज्ञ अन् अग्निहोत्र करूनही यशाची धाव गाठता आली नाही ती नाहीच. त्यामुळे असल्या निष्फळ धर्मकृत्यांची विकेट उडाल्याने चांगलेच तोंड भाजले आणि पुन्हा हात दाखवून अवलक्षण नको किंवा भरवशाच्या म्हशीला टोणगा होऊ नये म्हणून ही एकजात अंधश्रद्ध मंडळी मूग गिळून गप्प बसली असावीत. अर्थात त्यांचे काही विचारबंधू तिथे हजर होतेच. त्यांनी मजुरांची सुटका होताच तंत्रज्ञांचे अभिनंदन करण्याऐवजी ‘हर हर महादेव’ असा गजर करून बद्रीनाथाच्या दिशेने हात जोडले. कोणी काहीही म्हणो, पण या घटनेने देवाच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. कारण उत्तराखंड हे राज्य केरळप्रमाणेच देवांचे राज्य म्हणून समजले जाते. असे असले तरी हे धाम हिमालयाच्या कुशीत काहीशा दुर्गम स्थितीत वसलेले आहे.

बद्रीनाथांच्या दर्शनासाठी जाताना वाटेत अनेक डोंगर आडवे येतात. ते पार करून जाताना वेळेची नासाडी होते. म्हणून त्या डोंगरामधून बोगदा करावा, जेणेकरून यात्रेकरूंचा वेळ वाचेल आणि मंदिरी असलेल्या विष्णुदेवाचे दर्शन भाविकांना लवकर घडेल असे उत्तराखंडच्या राज्य सरकारला वाटले आणि त्यांनी बोगदा खणण्याचा प्रकल्प हाती घेतला. खरे तर मंदिरी बसलेल्या देवाने या कार्याला आशीर्वाद देऊन कार्य सुकर करायला हवे होते, परंतु घडले ते सर्वदृष्ट्या विपरीतच! कार्य सुकर करणे तर दूर राहिलेच, पण उलट त्या कार्यात बोगदा कोसळवून अडथळाच निर्माण केला. आता देवाच्या मर्जीशिवाय झाडाचे पानही हलत नाही, अशी श्रद्धा असलेल्या भाविकांना हे सगळे देवानेच घडवले असेच मानावे लागेल. मग त्याने असे का केले याचे उत्तर मात्र या भाविकांकडे नाही. जसे देवाच्या दर्शनाला, भेटीला तीर्थक्षेत्राला जाता-येताना मोठ्या प्रमाणावर भाविक यमसदनाला का जातात? याचे उत्तरही त्यांच्याकडे नसते तसेच.

विवेकीजनांकडे मात्र याचे उत्तर असते आणि ते म्हणजे असे की, अशा कुठल्याही दुर्घटनेत देवाचा मुळीच संबंध नसतो. कारण देव ही मानवाने अज्ञानापोटी, किंबहुना लोभापोटी आणि भीतीपोटी निर्माण केलेली एक कविकल्पनाच आहे असे अभ्यासांती त्यांचे ठाम मत झालेले असते. मानवी उपांतीत मानव शिकार सोडून स्त्रियांच्या सांगण्यावरून शेती करू लागला तेव्हा देवाची कल्पना अस्तित्वात आली, असे त्यांचे ठोस प्रतिपादन असते. आपण जगावे म्हणून वरून आकाशातून कोणीतरी आपला त्राता पाऊस पाडतो, ऊन सोडतो अशी त्या काळच्या मानवाची श्रद्धा झाली आणि देवाचा जन्म झाला, परंतु अध्यात्मात बुडालेल्या आणि अंधश्रध्देत सचैल स्नान केलेल्या आपल्या देशाला माणसाने देवाला जन्माला घातले हे मानवणारे नव्हते अन् पचणारेही नव्हते. त्यामुळे जग विज्ञानाच्या सहाय्याने आपला विकास करीत असताना आपण मात्र ‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी’ असे भरल्या अंत:करणाने आणि रिकाम्या पोटी म्हणत राहिलो.

खरं तर महापूर, भूकंप, दुष्काळ, रोगराई असल्या कुठल्याही प्रसंगी देव माणसाच्या पाठीशी उभा राहिला नाही की मोगलांच्या अन् ब्रिटिशांच्या गुलामगिरीत असताना त्याने काही साक्षात्कार अथवा चमत्कार करून आमची परकीय आाढमकांच्या अत्याचारांतून सुटकाही केली नाही. फार कशाला कोरोनाच्या हल्लकल्लोळातही त्याने काही प्रचीती दाखवली नाहीच. इवल्याशा त्या जंतूने आम्हाला ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडलं होते. तेव्हा त्याच्यापासून आमची सुटका होवो न होवो, पण देवाला वाचवावे म्हणून आम्ही पालनहार, तारणहार, विघ्नहर्ता समजल्या गेलेल्या देवालाच त्याच्या गृहात म्हणजे मंदिरात बंदिस्त करून टाकले. तेव्हाही तो आपली मानखंडना थांबवावी म्हणून प्रकट झाला नाही. कोरोनाच्या साथीत विज्ञानाने निर्माण केलेल्या औषधांनी, साधनांनी आणि अथक परिश्रम करून डॉक्टरांनी, परिचारिकांनी असंख्य जणांना जीवदान दिले, पण गंमत म्हणजे बरे झाल्यावर आम्ही पळालो ते पहिले देवाच्या दारी, राऊळी अन् मंदिरी! त्याने वाचवले, अशी श्रद्धा जोजवीत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी.खरे तर हा कृतघ्नपणा होता विज्ञानाप्रती. विज्ञानाप्रती अशी कृतघ्नता दर्शवणे हा तर आम्हां देशवासीयांचा स्थायिभाव झाला आहे. म्हणून तर आम्ही ‘जिथे विज्ञान संपते, तिथे अध्यात्म सुरू होते’ किंवा ‘अध्यात्माशिवाय विज्ञान पांगळे आहे आणि विज्ञानावाचून अध्यात्म लंगडे आहे’ अशी लंगडी वक्तव्ये करण्यात धन्यता मानीत असतो. सावरकर एका ठिकाणी (संदर्भ: ‘क्ष-किरणे’) म्हणतात, अपघातातून वाचवल्याबद्दल देवाचे आभार मानायचे असतील तर त्याने अपघातात ढकलले याबद्दल त्याची निर्भर्त्सनाही केली पाहिजे. देवाला नको तितके झुकते माप देऊन आम्ही विज्ञानाची हेळसांड करीत आलो. त्यामुळे आपली प्रगती केवळ कूर्मगतीनेच होऊ शकली, पण चिमणीएवढी राष्ट्रे मात्र विज्ञानाच्या आधाराने संपन्न तर झालीच, काही काळ त्यांनी हिंदुस्थानसह जगावरही राज्य केले. आपण मात्र ‘विज्ञानाची पोळी खाऊन अध्यात्माची टाळी’ वाजवीत राहिलो. परिणामी एक मागासलेला, अंधश्रद्धाळू देश म्हणून विश्वात आपली अपकीर्ती झाली. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी… देव नसतो तर विज्ञान असते आणि तेच सोबतीला असते, आपल्याला वाचवते याचा प्रकाश आम्हा हिंदुस्थानीयांच्या डोक्यात ज्या दिवशी पडेल तो खरा सूर्योदय म्हणायला हवा.

अज्ञानाच्या अंधारातून विज्ञानाच्या प्रकाशाकडे जायचे असेल तर आपल्या देवभोळेपणाला आवर घातलाच पाहिजे. ते जर आपण निग्रहाने, निष्ठेने केले तर या देवभोळेपणातून निर्माण झालेल्या आणि आपल्या देशाच्या विकासाच्या आड येणाऱया दैववादाला निश्चितपणे खीळ बसेल आणि त्यायोगे विकासाची, उत्कर्षाची पहाट आपल्या देशावर उजाडेल यात काही शंकाच नाही!
[email protected]
(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी
चळवळीशी निगडित आहेत)