
>> आकाश कदम
संवेदनशील कवी आणि प्राध्यापक असलेल्या अनिल साबळे यांचा ‘हा जन्म बुद्ध व्हावा’ हा गझल संग्रह नुकताच प्रकाशित झाला. स्वत अंध असूनही त्याचा बाऊ न करता बुद्धांची अतिव करुणा साबळे यांनी काळजातून थेट गझलांमध्ये ओतली आहे. पीएचडी केलेल्या साबळे यांच्या काही गझलांवर ध्वनिचित्रफिती निघाल्या आहेत. त्यांच्या आतापर्यंतच्या काही निवडक गझलांचा या संग्रहात समावेश आहे.
‘माणसे चौकात जेव्हा लागली दंगा कराया
बुद्ध त्यांना भेटले अन् टाकले हत्यार त्यांने’
या गझलेच्या मिसरा-ए-अव्वलमध्ये माणसामाणसांमध्ये वाढत चाललेली जातीय द्वेषभावना, धर्माधर्मांच्या भिंती त्यातून एखाद्या विशिष्ट समाजाला तुच्छ पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यातून वाढत जाणारी हिंसा दिसते. हिंसेने जग नष्ट होईल, परंतु बुद्धाचा मार्ग स्वीकारून माणुसपणाची भावना मनामध्ये जागृत होऊन हिंसेचा मार्ग कोणीही स्वीकारणार नाही, असा एक आशावाद
साबळेंनी व्यक्त केला आहे.
‘जीवनाला खोदतो लेण्यापारी
बुद्ध या खडकात असला पाहिजे’
या गझलेमधील खडक काय तर ते आपले अंतर्मन, मनाला खडकाची उपमा देऊन बुद्धाच्या दिलेल्या मार्गावर चालणे असा अर्थ प्रतीत होतो. बुद्ध धम्म हा मानवतावाद जपणारा असून त्या विचारावर आपल्याला आज चालण्याची गरज असल्याचे गजलकार सांगतात.
‘सारखे काटय़ाप्रमाणे लोकही रुततील काही
खूप काटे माणसाला बाभळी म्हणतील काही’
माणसाचा स्वार्थी स्वभाव बाभळीच्या काटय़ासारखा टोचतो. बाभाळीच्या काटय़ाचा जो स्वभावधर्म आहे तो माणसांमध्ये उतरला आहे. कोणत्याही माणसाचा स्वभाव त्याला चांगले-वाईट ठरवण्यास कारणीभूत ठरतो.
‘वाजते गाणे भिमाचे माझिया गाडीत आता
माझिया बाबांमुळे मी राहतो माडीत आता’
‘आता’सारख्या गझलेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रति आदरयुक्त भावना व्यक्त केली आहे. वेशीबाहेर मोडक्या झोपडीत राहिलेला समाज आता थाटामध्ये माडीत राहतो आहे हे सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे. त्यांनी या समाजाला शिक्षणाचा मार्ग दिला आणि कित्येक पिढय़ा अंधारात असलेला समाज आज प्रकाशवाटा चालत आहे. दलित, आंबेडकरी जाणिवांबरोबर प्रेम, विरह या भावनादेखील त्यांच्या गझलेतून वक्त होताना दिसतात.
‘होतीस म्हणाली तू की जखमेचा मोर करावा
फुलवून पिसारा मी ही दु:खाला सुंदर केले’
‘सुंदर’ या गझलेतून प्रेमविरहाची भावना व्यक्त करतात. सुख मोहक, सुंदर वाटते तसेच दु:खालाही सामोरे जावे लागते. परंतु दु:खाला ही सुंदर करण्याची भावना अनिल साबळे यांनी मांडली आहे. जीवनाकडे बुद्धांच्या नजरेतून पाहण्याची त्यांची धडपड आहे. प्रेमाची नि:स्वार्थ भावना त्यांच्या ‘गुलाबी वेदना’ या गझलेतून व्यक्त होते. प्रेमाबद्दल लिहिताना अनिल साबळे तितक्याच ताकदीने लिहितात जितक्या ताकदीने इतर विषयांवर भाष्य करतात.
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर बुद्ध हे ध्यानसाधनेच्या अवस्थेमध्ये असून त्यांचे जीर्ण झालेले शरीर गळून पडत आहे आणि त्या जागी नवीन तेजस्वी रूप त्यातून प्रकटताना दिसते. बुद्ध होण्याची ही अवस्था मुखपृष्ठावर पाहायला मिळते, तर पुस्तकाच्या मलपृष्ठावर शोषित वंचित समाजाला गुलामीच्या बंदिस्त बेडीतून मुक्त करणाऱया भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी छायाचित्र आहे.
हा जन्म बुद्ध व्हावा गझलकार : अनिल साबळे
प्रकाशन : हरिती प्रकाशन, पुणे मूल्य : 150 रुपये






























































