खाणं आणि बरंच काही – चटकदार चांदणी चौक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आरती देवगावकर 

मागच्या लेखात अर्धवट राहिलेली दिल्लीवारी… चटकदार, खमंग अशा चांदणी चौकातून…

मागच्या वेळी अर्धवट सोडलेली दिल्लीवारी आता पूर्ण करूया. सकाळी तिघेही लवकर उठलो होतो. जुन्या दिल्लीतून रमतगमत फिरत होतो. लेकाला जायचे होते, दिल्लीची फेमस ‘नल्ली न्याहारी’ बाबांना आवर्जून खाऊ घालायला. आम्ही हॉटेलमध्ये गेलो. तिथे ऑर्डर दिली. मी शुद्ध शाकाहारी असल्याने काही मिळते का याची पृच्छा केली; पण तिथे माझ्यासाठी काहीच नव्हते. मी मुकाटय़ाने या दोघांकडे बघत बसले. त्यांना सवय होती, पण बाकी लोक माझ्याकडे ‘अरेरे, बिचारी!’ असा लूक देऊन बघत होते. इथे येऊन तोंडही न हलवणारी व्यक्ती बहुतेक मी पहिलीच असेन. वेटरने अगत्याने मला पर्याय दिले. बिचाऱयाला वाटलं हिला सकाळी सकाळी एवढे खायचं नाही; पण तो देत असलेल्या यादीतले मला काहीच चालत नाही म्हटल्यावर नाईलाज झाला त्याचाही. मी खात नसले तरी मला त्याचे वावडे नाही. हा पदार्थ खूप प्रसिद्ध आहे, कारण यातील मसाल्यांमध्ये मुरवलेले मटण रात्रभर मंद गॅसवर शिजत ठेवतात. त्यातील नळी खाणे हा खवैयांचा आत्यंतिक समाधानाचा भाग असतो.

दुसऱया दिवशी चांदनी चौकात जायचे होते. आम्ही गेलो तेव्हा बरीचशी दुकाने बंद होती. रस्त्यावर चालताना एक गुरुद्वारा दिसला. अतिशय शांत वातावरणात तिथे गुरू ग्रंथसाहिबचं पठण चालू होते. आलेले भाविक शांतपणे तिथे मांडून ठेवलेल्या आसनांवर बसून ते भक्तिभावाने ऐकत होते. प्रसाद म्हणून तिथे पुढय़ात आला तो साजूक तुपात निथळणारा कडा प्रशाद. अर्थात कणकेचा शिरा. हा प्रसाद घेतला आणि सुरू झाली आमची चांदनी चौकातली चटकदार खाद्ययात्रा.

गुरुद्वाराच्या जेमतेम 100-200 मीटरवर जिलबी-रबडीचे दुकान दिसले. इथे दुकान म्हणाले तरी त्या असतात आपल्याकडच्या जरा मोठय़ा आकाराच्या टपऱया. दुकानेही आहेत; पण इथे जी चव मिळते त्याची बात काही औरच! आधीच्या गोडावर हे गोड लागणार नाही म्हणून आधी सामोसा घेतला. तो ठीकठाक होता; पण गरमगरम जिलबी आणि त्यावर थंडगार अगदी दाट अशी रबडी, अहाहा! पुनः पुन्हा खावी अशीच चव; पण पुढे बरेच काही खायचे होते, त्यासाठी पोटात जागा ठेवणे आवश्यक होते. दिल्लीतला शेवटचा दिवस होता. पुन्हा कधी यायला मिळेल माहिती नाही, त्यामुळे बरेच पदार्थ विश लिस्टमध्ये होते.

मोर्चा वळवला पराठेवाली गलीकडे. हिच्याबद्दल खूप ऐकले होते. मुख्य रस्त्यावर एक लहानसा बोळ म्हणजे ही सुप्रसिद्ध पराठेवाली गली. तिथे बरीच लहानलहान दुकाने फक्त आणि फक्त विविध प्रकारचे परोठे विकतात. ते करताना पाहणं हादेखील वेगळा अनुभव होता. ग्राहकाने मागितलेले सारण कणकेत भरून सपासप परोठे लाटले जात होते आणि तुपाने भरलेल्या कढईतून चपळाईने तळले जात होते. तव्यावर शेकून तूप सोडणे वगैरे सोपस्कार करायला वेळच नसतो त्यांना एवढी गर्दी असते. ताटलीत परोठा, लोणी, लोणचे आणि हिरवी चटणी असे पुढय़ात आल्यावर तो तळला आहे हे लक्षातदेखील येत नाही. तिथे नेहमीचे प्रकार तर होतेच; पण गोडात सुकामेवा परोठा आणि निंबू पराठा हे फारच वेगळे वाटले. मी आंबटशौकीन नसल्याने मला निंबू नाही आवडला, मात्र बाकी सगळ्याची चव सुरेख होती. कडेपर्यंत पसरलेले सारण, वरचा कणकेचा अगदी पातळ तरी न फाटलेला पापुद्रा, शेकणे आणि तळणे याच्यामधली खरपूस चव आणि स्पर्श, सारे काही अजून तसेच आठवते आहे.

परोठे खाऊन पोट जरा गच्च झाले म्हणून तोवर उघडलेल्या दुकानांमधून विंडो शॉपिंगची मजा लुटली. त्याच वेळी खाण्यासारख्या पदार्थांची दुकाने मनाशी टिपून ठेवली. चालून पुन्हा भूक लागल्यावर गेलो एका कोपऱयावरच्या भल्यामोठय़ा भजीच्या दुकानात. तिथे पनीर घातलेली मुगाची भाजी असे वाचले. मुग भाजी आवडतात आणि पनीरही. मग हे खायलाच हवे असे न वाटल्यास नवलच! दोन प्लेट घेतल्या खऱया; पण मला काही ती चव फारशी आवडली नाही. पनीरच्या तुकडय़ाभोवती मुगाच्या भाजीचे आवरण. दोन्ही वेगवेगळे केले असते तर जास्त आवडले असते कदाचित. इथे एक वेगळी बाब लक्षात आली, ती म्हणजे आपल्याकडे जसे चाटवर शेव-कोथिंबीर घालून देतात तसे दिल्लीत मुळ्याचा, बिटचा कीस घालून देतात. काही ठिकाणी मुळ्याच्या पातळ चकत्याही होत्या. गंमत म्हणजे तो मुळा आपल्या इकडच्या सारखा तिखट-तुरट नसतो, तर किंचित गोडसर असतो.

तिथून पुढे येताना एक मजेशीर दुकान दिसले. एकाच दुकानात दोन मजले केलेले; ते पण चक्क फळी टाकून. खाली बसलेला माणूस रस्त्याच्या वर जेमतेम पाहू शकेल इतका खाली. वरचा माणूस उठून दुकानाबाहेर गेल्याशिवाय त्याला उठणेही शक्य नाही. त्या दुकानाच्या बाहेर प्रचंड गर्दी होती. त्याच गर्दीत घुसून आम्ही पापडी चाट खाल्ले, आजवरच्या आयुष्यात खाल्लेला तो सर्वांत चविष्ट होता. मग तिथेच चाटचे अजून तीन-चार प्रकार खाल्ले – आलू टिक्की, छोले टिक्की, रगडा पुरी. त्याच्या चविष्ट चटणीने जिभेला चांगलाच झटका बसला म्हणून शेजारच्या दुकानात दहीभल्ला अर्थात दहीवडा घेतला. द्रोणात आलेला चेंडूच्या आकाराचा वडा, त्यावर फेटलेले थंडगार मधुर दही, वर चिंचेची आणि हिरवी चटणी, जिरेपूड, इ. मसाला आणि फेमस मुळा! भाजलेली जीभ आणि पोट दोन्ही थंड झालं. चार दुकाने पलीकडे असलेल्या फालुदावाल्यावर अन्याय नको म्हणून दोघांत एक फालुदा घेतला, तर नवऱयाने लस्सी घेतली. आता मात्र पोट खरोखरच भरले होते. काही म्हणता काही खाऊ शकणार नाही याची खात्री पटली होती आणि आम्ही झोप काढावी म्हणून हॉटेलच्या दिशेने कूच केले. आता अजिबात इकडेतिकडे पाहायचे नाही, कशाचा मोह नको असे एकमेकाला बजावत चालत होतो… आणि हाय रे दैवा! फुटपाथवर माझ्याच समोर एक गाडी उभी होती, वाराणसी स्पेशल मलाईयोची! पोट मजबूत भरलेलं असतानाही याच्या दोन प्लेट सहज आत सामावल्या गेल्या, म्हणजे बघा किती सुंदर असणार तो. नसायला काय झालं, पिठीसाखर, केशर घालून फेटलेलं क्रीम, साय, वर भुरभुरवलेली सुकामेवा पावडर. वाईट कशाला लागतंय. असं चित्रविचित्र पदार्थांचं कॉम्बिनेशन करून भरलेल्या पोटाने, दमलेल्या पायांनी आणि जडावलेल्या डोळ्यांनी हॉटेलकडे कूच केले.

(लेखिका अनुवादक व समतोल या द्वैमासिकाच्या संपादक आहेत.)
[email protected]