
>> अभिराम भडकमकर
मराठी रंगभूमीमध्ये प्रायोगिकता वेगळी काढली जाऊ शकत नाही. स्पर्धा रंगभूमीवर तर प्रायोगिकता खळखळून वाहत असते आणि त्यामुळे स्पर्धा रंगभूमी हा केंद्रबिंदू ठेवून डिझाईन केलं गेलेलं यंदाचं नाटय़ संमेलन हे खरोखरच आगळं वेगळं आणि महत्त्वाचं नाटय़ संमेलन ठरणार आहे.
ये त्या पाच, सहा, सात जानेवारीला नाटय़ संमेलन होत आहे. अखिल भारतीय नाटय़ परिषदेतर्फे होणारे हे संमेलन यंदाचे शंभरावे असल्याने त्याचा एक वेगळाच डौल आहे.
आपण भारतीय माणसं तशी सोहळाप्रिय! त्यात न्यूनगंड किंवा कमीपणा वाटण्याचं काही कारण नाही. जगभरातला माणूस मानव हा विविध सोहळे साजरे करत असतो. आपले फक्त धार्मिक सोहळे नसतात. किंबहुना आपल्या प्रत्येक धार्मिक सोहळ्यालासुद्धा निसर्ग व नैसर्गिक बदल हे जोडलेले असतात. आपण वर्षा ऋतूचे स्वागत करतो. आपण शिशिराचं स्वागत करतो. आपण पूर्वीच्या काळात तर तरुण-तरुणींच्या शरीरामध्ये होणाऱया बदलांचंसुद्धा स्वागत करत असू. इतकंच काय, साठ वर्षे पूर्ण केली म्हणून सोहळा, ऐंशीव्या वर्षानंतर सहस्रचंद्रदर्शन सोहळा. आयुष्याचा सोहळा करणे आपल्याला आवडतंही आणि जमतंही. अर्थात त्याला नाक मुरडणारी मंडळी असतातच. पण नाक आहे म्हणून ते मुरडलेच पाहिजे अशा वृत्तीच्या मंडळींकडे दुर्लक्ष करण्याचासुद्धा एक सोहळा असला पाहिजे असं मला वाटतं. अहो आपल्याकडे नाटक पाहणं हासुद्धा एक सोहळा होता. छानपैकी रंगमंदिरात जायचं. जाताना बाहेर सहचरणीसाठी एखादा गजरा घ्यायचा. अंगावर विशेष पोशाख चढवलेला. अगदी नाटय़गृहातसुद्धा ते अत्तरांचे दिवे, झगमगाट!
‘नामुकं’ म्हणजे नाके मुरडणाऱया कंपनीने याचीही टिंगल केलीच. पण हीच मंडळी पाश्चात्त्य देशांमध्ये ऑपेरा पाहायला जाताना विशिष्ट प्रकारचा सूट आणि विशिष्ट प्रकारची वाईन हा ऑपेरा पाहण्याच्या सोहळ्याचा एक भाग असतो, हे मात्र बिनदिक्कतपणे स्वीकारून टाकतात. सांगतातही, ‘अमुकतमुक ऑपेरा पाहिला’ आणि मग तेव्हाचे हे असे सुटा-वाईनातले फोटो!!!
या ‘नामुकं’ना गजरा मात्र टोचतो. आपलं ते सारे टोचणं हा या नामुकंचा एक खास विशेष असतो! त्यामुळे तिकडे आपण दुर्लक्ष करू. पण आपले सर्वच सोहळे हे निसर्ग आणि आरोग्य याच्याशी संबंधित असतात. मग संक्रांत असो अथवा गुढीपाडव्याला कडुलिंबाचे पान जबरदस्तीने का असेना खायला लागणार, असो. त्यामुळे नाटय़ संमेलनाचा सोहळा सादर करत साजरा करतानासुद्धा आपण आपल्या नाटय़विषयक जाणिवांचे आरोग्य तपासून पाहायला हरकत नाही.
मराठी रंगभूमीचे ढोबळमानाने तीन भाग पाडता येतील. एक स्पर्धा रंगभूमी, जिथे विविध प्रकारच्या एकांकिका स्पर्धा आणि नाटय़ स्पर्धांचा समावेश होतो. इथे तरुण रंगकर्मींचा वावर नजरेत भरण्यासारखा आहे. यात प्रामुख्याने महाविद्यालयीन पातळीवरच्या स्पर्धा लक्षात घेता येतील. इथे मिळतील त्या साधनांसह, अनेकदा साधनांच्या शिवाय हे तरुण वेगवेगळ्या आशय-विषयाचं सादरीकरण करताना दिसतात. किंबहुना जेवढा साधनांचा अभाव तेवढी सर्जनशीलता अधिक असते की काय असे वाटू लागते. राज्य नाटय़ स्पर्धा हादेखील मराठी रंगभूमीवरचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. गावोगावचे रंगकर्मी वर्षातून एक दोन अंकी पूर्ण लांबीचे नाटक सादर करतात. हे फक्त महाराष्ट्रातच इतक्या मोठय़ा प्रमाणावर घडताना दिसते. याखेरीस विविध कंपन्या, संस्था नाटय़ स्पर्धा भरवताना आपल्याला दिसतात. या स्पर्धांतून नाटय़विषयक जाणिवा विकसित होतात. रंगभूमीविषयक आकलन वाढत जाते. या स्पर्धा जशा सर्जक कलावंत जन्माला घालतात तशाच त्या प्रेक्षकांचं सांस्कृतिक भरण-पोषणही करतात.
हे लक्षात ठेवूनच यंदाच्या नाटय़ संमेलनामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये एकांकिका स्पर्धा, अभिवाचन, नाटय़संगीत पद गायन, एकपात्री, नाटय़छटा, बालनाटय़ स्पर्धा यात लेखन दिग्दर्शन, अभिनय अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे. स्पर्धा म्हणजे केवळ पुरस्कार नव्हे. तो त्याचा एक भाग असेल. पण स्पर्धा म्हणजे व्यासपीठ. तरुणाईला व्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ लागतं. पुण्यामध्ये राजा नातू या अवलियाने महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेच्या द्वारे पुरुषोत्तम करंडक नावाची एक प्रयोगशाळाच युवा रंगकर्मींना बागडण्यासाठी बांधून ठेवली. हे सांगण्याचे कारण म्हणजे आजच्या या शंभराव्या नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल हे या स्पर्धेचेच एक प्रॉडक्ट आहे. हे लक्षात घेतलं म्हणजे स्पर्धा या गोष्टीचं स्थान काय आहे ते आपल्या लक्षात येतं.
मराठी रंगभूमीमध्ये प्रायोगिकता वेगळी काढली जाऊ शकत नाही. स्पर्धा रंगभूमीवर तर प्रायोगिकता खळखळून वाहत असते आणि त्यामुळे स्पर्धा रंगभूमी हा केंद्रबिंदू ठेवून डिझाईन केलं गेलेलं यंदाचं नाटय़ संमेलन हे खरोखरच आगळं वेगळं आणि महत्त्वाचं नाटय़ संमेलन ठरणार आहे.
प्रशांत दामले यांच्या हसतमुख आणि कार्यक्षम नेतृत्व नेतृत्वाखाली होणारं हे संमेलन समस्त तरुणाईला आणि त्यांच्या प्रायोगिक सर्जनशीलतेला कवेत घेऊन साजरं होत आहे हा अत्यंत आनंदाचा भाग आहे. या स्पर्धा करता करता वेगवेगळ्या प्रकारची व्यासपीठं जसजशी उपलब्ध होत जातात, तसतसं स्पर्धा ही दुसऱयाशी नसतेच तर ती स्वतशी असते हे लक्षात येऊ लागतं. मन परिपक्व होऊ लागतं… आणि मग पुरस्कार आणि अन्य बाबींसोबतच स्वतची स्पर्धा करण्याची मानसिकता निर्माण होऊ लागते. आपण काल काय केलं आणि आज काय करतो आहोत याचा धांडोळा मन सतत घेऊ लागतं.
त्याचप्रमाणे या नाटय़ संमेलनाच्या निमित्ताने स्पर्धांमध्ये भाग घेणारी ही तरुणाई हळूहळू नाटक पाहणारे चांगले प्रेक्षक आणि नाटक करणारे चांगले रंगकर्मी होतील. मग सोहळा हा केवळ चार दिवसांचा आनंदोत्सव राहणार नाही, तर ती रंगभूमीच्या भवितव्याची पायाभरणी ठरेल. कुणी सांगावं, या स्पर्धकातला असा कोणीतरी भिरभिरत्या नजरेने ‘नाटक म्हणजे काय असतं भाऊ?’ असे विचारत या स्पर्धेत उतरेल. हळूहळू त्याचा अनुभव, त्याचा व्यासंग आणि त्याचे कष्ट त्याला शिकवून जातील की, ‘नाटक असं असतं राजा, नाटक असं असतं!’ तो स्वतची नवी रंग परिभाषा शोधून काढेल. रंगभूमीचे आजवरचे सारे नियम, निकष बाजूला करून काही वेगळेच शोधून काढेल. परंपरेचा आदर राखत राखत, तिची चिकित्सा करत, नव्या परंपरा निर्माण करेल. कुणी सांगावं, काही वर्षांनी काही दशकांनी होणाऱया नाटय़ संमेलनाचा अध्यक्षही होईल!
हे वर्तुळ असंच चालू राहतं. म्हणून सोहळे हे फक्त सोहळे नसतात. त्यामागे एक विचार असतो. त्यामागे एक प्रयोजन असतं. नामुकंचा भाग होऊन निक्रिय तुच्छताबादचा बळी व्हायचं की मोकळ्या मनानं सोहळ्यामध्ये सहभागी होऊन काहीतरी नवं घडेल या अपेक्षेने त्यात सहभागी व्हायचं, हे आता आपल्या हातात. मला मात्र मी आत्तापर्यंत हजेरी लावलेले कणकवली, बारामती, संगमनेर अशा वेगवेगळ्या संमेलनांचे दिवस आठवतात. त्या भेटीगाठी, त्या गप्पा, त्या चर्चा, ती मनमोकळी भांडणं आणि यातूनच अरे आपण तर एका नाटय़ परिवाराचे सदस्य आहोत असा मिळणारा दिलासा…
एकदा का चेहऱयाला रंग लागला की नाटक नावाचं व्यसन माणसाच्या आयुष्याचा ताबा घेतं. मग तो पुढे आयुष्यात नाटक करो अथवा न करो, तो नाटकाशी जोडलेला असतो. सध्या रंगभूमीवर कार्यरत, काही कारणांमुळे कार्यरत राहू न शकलेले, अन्य व्यवसायामुळे रंगभूमीपासून दूर असलेले आणि रंगभूमीच्या या गारुडामुळे त्याकडे आकर्षित होऊन नुकतंच नाटक करू लागलेले किंवा करू इच्छिणारे… असा आपल्या सर्वांचा हा सोहळा आहे.
नववर्षाची सुरुवातच आपण एका सोहळ्याने करत आहोत. तेव्हा पाच, सहा, सात जानेवारी या तारखा राखून ठेवा आणि चला!
संपूर्ण भारतामध्ये आदराचे स्थान असलेल्या मराठी रंगभूमीच्या या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा. कुणीतरी म्हटलंय, एक माणूस पाहण्यासाठी असेल आणि एक माणूस करण्यासाठी असेल तोवर नाटक होतच राहील. आपण सुदैवी. आपल्याकडे करणारेही भरपूर आहेत आणि खिशात हात घालून तिकीट काढून नाटक पाहणारेसुद्धा प्रचंड संख्येने आहेत. त्यामुळे नाटक होतच राहणार. सोहळा आनंदोत्सव करू, स्वतची चिकित्सा करू, समीक्षा करू. नवता आणि परंपरा हातात हात घालून ज्या रंगभूमीवर नांदत असतात अशा मराठी रंगभूमीचा झेंडा, पताका फडकत ठेवू.
चला! भेटू बोलू साजरा करू, उत्सव रंग देवतेचा…!!
(लेखक नाटय़कर्मी असून नाटय़क्षेत्राचे अभ्यासक आहेत)





























































