गृहसंरचना व सजावटीची सप्तपदी

>> अजय सावरगावकर

हल्ली ‘इंटिरियर डिझायनिंग’ या इंग्रजी शब्दाचा मराठी अनुवाद सरसकट ‘गृहसजावट’ असा केला जातो. यातून मला कुठेतरी अपुरेपण जाणवतं. ‘गृहसंरचना आणि सजावट’ हे जास्त बरोबर वाटतं. खूप खर्चिक, चकचकीत, भरगच्चपणे घर सजवणं हा मूळ हेतू नसून त्या घरात राहणाऱया माणसांना सोयिस्कर, सकारात्मकपणे घराचा कानाकोपरा वापरता यावा व या सोयी करताना घर कलात्मकरीत्या सजवलंही जावं असा उद्देश खरं तर डिझायनरचा हवा. लग्नात जशी सप्तपदी घातली जाते, एक नवं नातं सुंदरपणे फुलण्यासाठी, त्याचप्रमाणे इंटिरियर डिझाइन करतानाही एक सप्तपदी आपण चाललो तर आपलं आणि आपल्या घराचं सुंदर नातंही नक्की बहरतं.

एका सकाळी माझा शाळेपासूनचा घट्ट मित्र ‘राजेश’ घरी हजर झाला. त्याला त्याच्या घराची संरचना व सजावट नव्याने करायची होती. माझ्या कन्सल्टेशनची फी म्हणून आधी एक चेक त्याने माझ्या हातात ठेवला. तेव्हा हसून मी तो चेक त्याला परत दिला व त्याला माझी ही सप्तपदीची कल्पना सांगितली. त्याला ती आवडली व त्याने ती आचरणातही आणली. काम करताना ती पूर्ण प्रक्रिया हळूहळू उलगडत गेली व परिणामी राजेशचं घर अत्यंत सीमित वेळात, मर्यादित खर्चात उत्तम सजलं. घराचं इंटिरियर बदलताना डिझायनर, त्या घरात राहणारं कुटुंब व कॉन्ट्रक्टर असे तीन महत्त्वाचे घटक यात कार्यरत असतात. आता या तिघांनी जी सप्तपदी चालायची असते, त्यातली सात पावलं आपण बघूया.

n पहिलं पाऊल म्हणजे चेकलिस्ट – बाजारात आपण जर योग्य यादी घेऊन खरेदीला गेलो तर आवश्यक तेवढय़ाच वस्तू वाजवी दरात विकत घेता येतात व पैसा, वेळ यांचा अपव्यय टाळता येतो. त्याचप्रमाणे इंटिरियर डिझाइन करताना आपल्या घरातल्या माणसांच्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत करायच्या ऑक्टिव्हिटीज व त्यासाठी लागणाऱया सोयी लिहून काढाव्यात. म्हणजे घर री-डिझाइन करताना ते सर्व मुद्दे डिझाइनमध्ये समाविष्ट करता येतात. कुटुंबातल्या प्रत्येकाची आवड-निवड, सवयी, घरात पाहुणे किती असतात इ. बाबींची नोंददेखील करावी. म्हणजे नव्या संरचनेत याचाही विचार करता येतो.

n दुसरं पाऊल म्हणजे घराचा पूर्ण अभ्यास व मोजमाप- घराच्या सध्याच्या रचनेचे मोजमाप घेऊन त्यात काही बदल अपेक्षित आहेत का? जर ते केले तर घराच्या व इमारतीच्या मूळ रचनेला व सुरक्षिततेला बाधा तर येणार नाही ना? हे नीट समजून घेऊन त्याप्रमाणे डिझाइनचे दोन-तीन पर्याय बनवून, त्या कुटुंबाला दाखवून त्यांच्या सूचनांनुसार पुन्हा योग्य ते फेरबदल करून डिझाइन नक्की करून घ्यावं. म्हणजे काम प्रत्यक्ष सुरू झाल्यावर त्यात सतत बदल होणं, खर्चात वाढ होणं, वेळेचा अपव्यय होणं हे मनस्ताप टळतात.

n यात तिसरं पाऊल असतं ते प्लॅनिंग – एकूण खर्चाचं व वेळेचं परखड नियोजन करून घ्यावं, जेणेकरून कुटुंबाला आवश्यक ती आर्थिक तरतूद करता येते. नेमपं घर हातात पुन्हा केव्हा येईल हेही स्पष्ट होतं. असं नियोजन असल्यावर खिशावर व मनावर ताण येत नाही.

n याच्या पुढचं चौथं महत्त्वाचं पाऊल म्हणजे ‘साईन ऑफ’- इंटिरियर डिझायनर, कुटुंबप्रमुख, व कॉन्ट्रक्टर यांनी एकत्र बसून डिझाइन कन्सेप्ट, ड्रॉइंग्स, बजेट (सर्व सामानाच्या मूळ किमतीचा अंदाज घेऊन बजेट बनवलं जातं) व काम पूर्ण होण्यास लागणारा अवधी, टाइल्स, लॅमिनेट इत्यादी सामान निवडण्यासाठी या तिघांनाही एकत्र जाता येतील असे कमीत कमी दहा दिवस नक्की करणं, कॉन्ट्रक्टरला किती हप्त्यांमध्ये व कशा प्रकारे पैसे देण्यात यावेत हे सर्व एकत्र बसून नक्की ठरवून घ्यावं. म्हणजे पुढची शारीरिक व मानसिक दगदग खूपच कमी होते.
n पुढचं पाचवं पाऊल म्हणजे प्रत्यक्ष मटेरियल सिलेक्शन – हे करताना आधी सांगितलेला गृहपाठ पक्का असल्यास हे पाऊल अगदी सहज व आनंदाने टाकता येतं. साधारणतः महिनाभरात ही पाच पावलं आपण चालून जाऊ शकतो.

n आता प्रत्यक्ष काम सुरू झाल्यावर सहावं पाऊल टाकायचं ते म्हणजे नव्या संरचनेची प्रत्यक्ष प्रक्रिया – या प्रक्रियेवर नजर ठेवणं, तिचा आनंद घेणं व तिघांनीही (डिझायनर, क्लायंट व कॉन्ट्रक्टर) एकमेकांवर विश्वास ठेवून समन्वयाने काम करणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे त्या घरात सकारात्मक ऊर्जा सुरुवातीपासूनच मूळ धरते.

n आता शेवटचं पाऊल असतं ते हस्तांतरण करण्याचं – घरातल्या कुटुंबाला ते नव्याने सजलेलं घर परत सोपवलं जातं. घरातील नव्या गोष्टींना कसं हाताळावं, नवीन किल्ल्या, नवा दरवाजा, सुरक्षिततेचा दरवाजा, खिडक्या यांच्या लॉकिंग सिस्टम्स, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल सुविधा या सर्वांची संपूर्ण माहिती कुटुंबीयांना दिली जाते. नंतरही काही दिवस आवश्यक असल्यास माणसं पाठवून गरजेनुसार छोटी-मोठी कामं व दुरुस्ती या सेवा पुरवल्या जातात.

अशा पद्धतीने डिझायनिंगच्या सप्तपदी पार पाडल्या तर एक छान, सुखी, आनंदी घर आपल्याला नांदायला नक्की मिळतं. राजेशने माझ्या सल्ल्यानुसार या सप्तपदीचा पूर्ण वापर केला व ठरलेल्या वेळेत व बजेटमध्ये आपल्या नवीन घरात आनंदाने राहायला गेला.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या