
>> प्रा. अनिल कवठेकर
एखादी वस्तू चोरीला जाणे आणि हरवणे यात अंतर आहे. वस्तू चोरीला गेली म्हणजे ती पुन्हा सापडणार नाही याची खात्री असते; पण वस्तू हरवली तर ती कुठेतरी नक्की आहे आणि ती कधीतरी सापडणार याची पूर्ण खात्री असते. कधी कधी दुसरी वस्तू शोधताना ध्यानीमनी नसताना ती पहिली हरवलेली वस्तू आपल्याला सापडते. असंच काहीसं या चित्रपटाचं आहे. हरवलेल्या चित्रपटाच्या पहिल्या भागाचा शोध घेत असताना ‘सदमा’ हा मनाच्या कप्प्यातून हरवलेला चित्रपट अचानकपणे सापडला.
‘सदमा’ची कथा एका वाक्यात सांगायची तर ती अशी की, एक सुंदर तरुणी आपल्या कारमधून रस्त्याने जात असताना तिची कार एक ट्रक उडवतो. त्या अपघातात तिला फारसे काही लागत नाही, पण तिच्या मेंदूला एक जबरदस्त धक्का बसतो आणि त्यामुळे तिची स्मृती जाते आणि वयाच्या सातव्या वर्षापर्यंतची स्मृती राहते. उंचीने आणि शरीराने जरी ती 22-23 वर्षांची दिसत असली तरी तिचे मानसिक वय सातच वर्षांचे असते. सोमू नावाचा एक भोळाभाबडा, सरळ, साधा व स्वच्छ चारित्र्य असणारा शिक्षक तिचा सांभाळ करतो. खरं तर तिच्या प्रेमात पडतो. अशी ही कथा आहे.
रश्मीची (श्रीदेवी) कारला अपघात झाल्यावर ती जेव्हा शुद्धीवर येते, तेव्हा ती आईवडिलांना ओळखत नाही. त्यावेळी डॉक्टर सांगतात की, तिची फक्त सात वर्षांपर्यंतची स्मृती शिल्लक आहे. ती बरी होईल, पण त्याला किती काळ लागेल ते सांगता येत नाही.
सोमू नावाच्या शिक्षकाला त्याचा मित्र रेडलाईट एरियात घेऊन जातो. तिथे त्याला रश्मी सापडते. तो जेव्हा तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती त्याला ग्लासने चांगलाच दणकावते. त्याच्या कपाळातून रक्त येते. सोमूकरता हा अनुभव पहिला असतो. मनाने सात वर्षांची झालेली रश्मी ‘मैं डर गई थी ना…’’ असे सांगते तेव्हा एका क्षणात तिच्या आयुष्याची कथा कमल हसनच्या डोळ्यात स्पष्ट होताना प्रेक्षकांना दिसते. तिथून तो तिला बाहेर काढतो आणि आपल्या गावी घेऊन येतो.
कथेच्या, संवादाच्या प्रेमात किंवा लोकेशनच्या प्रेमात आपण पडत नाही, तर प्रत्येक दृश्यामध्ये श्रीदेवी जी सात वर्षांच्या बालिकेची भूमिका साकारते, त्या अभिनयाच्या प्रेमात आपण पडतो. अख्खा चित्रपट श्रीदेवीने स्वतःच्या अभिनयाच्या बळावर लीलया उचलून धरलेला आहे. सात वर्षांच्या बालिकेचे सगळे व्यवहार, त्यातले बारकावे, छोटय़ा छोटय़ा गोष्टी, वागणे, बोलणे, चालणे, रुसणे, खेळणे, सोमू रागावल्यानंतर लहान मुलीसारखे रडत रडत धावत जाऊन नानीच्या मांडीवर बसणे, या सगळ्या गोष्टी अत्यंत बारकाईने निरीक्षण करून श्रीदेवीने अभिनयातून उत्तमरीत्या प्रकट केलेल्या आहेत.
एखाद्या छोटय़ाशा कथेवर किंवा कथेच्या ओळीवर आधारलेला चित्रपट केवळ अभिनयाने किती सुंदर होऊ शकतो त्याचे उदाहरण म्हणजे हा ‘सदमा’ होय!
ट्रेनमध्ये ती आईस्क्रीमचे दोन कोन घेते आणि वितळलेले आईस्क्रीम हातावर घसरत खाली जाते. कोपरापर्यंत ओघळलेले आईस्क्रीम ती चाटून खाते. त्याच डब्यात बसलेल्या तिच्या एवढय़ाच वयाच्या मुलीला ती ‘हवं का?’ म्हणून विचारते, पण तिच्या डोळय़ात मात्र ते देण्याचा भाव अजिबात नसतो. ही ती अभिनयाची कसोटी होय.
एकदा तिला कुत्र्याचे पिल्लू हरिप्रसादला टिकली लावायची असते म्हणून शाई हवी असते. नायक स्वयंपाक करत असते. घाईने ती कपाटावरची शाईची बाटली घेण्याच्या धावपळीत ती बाटली पडते, कपाट पडते. घरात सगळा पसारा होतो. तिने केलेला पसारा आवरत असताना भाजी जळून जाते. त्याक्षणी नायक विसरतो की, ती लहान मुलगी आहे आणि तो तिला ओरडतो. ती रागावून बाहेर निघून जाते. तो तिला दिवसभर डोंगरवाटा, नदीकिनारी, झाडांमध्ये शोधतो. झाडाखालच्या गणेशाच्या मूर्तीलाही विनंती करतो. शेवटी तो घरी येतो तेव्हा ती त्याची वाट पाहत बसलेली दिसते. ती रडत असते तो भेटला म्हणून आणि तो रडत असतो की, ती सुरक्षित आहे म्हणून. ती लहान मुलीसारखी रडते आणि तो मोठय़ा माणसासारखा रडतोय. हे दृश्य गहिवरून टाकणारे दृश्य आहे. एखाद्या दृश्यात कलाकार जीव ओतून काम करतात ते इथे आपल्याला कळते. कधी कधी वास्तवापेक्षा अभिनय अधिक सुंदर असतो असे हे दृश्य आहे.
गुलशन ग्रोवर यात खलनायक आहे. बालू नावाचा लोहार आहे. पहिल्या दिवसापासूनच त्याची रश्मीवर वाईट नजर आहे. तो तिला फसवून एका पडक्या घरात घेऊन जातो; त्याच्या तावडीतून रश्मी सुटते आणि हे जेव्हा नायक सोमूला कळते तेव्हा सोमूच्या मनातला उद्रेक पाहून आपण थक्क होतो. तो बालूचे दुकान उद्ध्वस्त करून टाकतो. त्याचा संताप त्याच्या कृतीतून स्पष्ट दिसते. त्याच्या प्रेमाचा झालेला अपमान त्याला सहन होत नाही. त्याच्या मनातले प्रेम हे त्याला सोडून कोणालाच कळत नाही. ते अव्यक्त प्रेम आहे. त्याने जपलेले हे प्रेम जेव्हा कोणीतरी ओरबाडण्याचा प्रयत्न करते, तेव्हा त्याच्यातल्या संतापाचा ज्वालामुखी त्वेषाने बाहेर पडतो. हा एकच प्रसंग सोमूच्या मनातल्या खदखदणाऱया भावनांना बाहेर काढण्यास मदत करतो.
आईवडिलांनी तिला शोधण्यासाठी पेपरमध्ये जाहिरात दिलेली आहे. ती जाहिरात एका सज्जन माणसाला दिसते. तो रश्मीच्या आईवडिलांना जाऊन भेटतो. ते आता रश्मीला शोधणार म्हणून आपल्या छातीत हुरहुर होऊ लागते की, आता सोमूचे काय होणार? तो त्याच्या वेडय़ा प्रेमाच्या आनंदात जगत आहे आणि आपण आता काय होणार या विचारात आहोत. असे प्रेक्षकांना पकडणे दिग्दर्शनाचा एक चांगला भाग ठरतो.
तो तिला गाण्यातून ‘निळा कोल्हा’ची गोष्ट सांगतो. ते सांगताना तो कमालच करतो. खेळतो, उडय़ा मारतो, वाकडा तिकडा चालतो, वेगळा आवाज काढतो. तो कथेत आणि त्या दृश्यात रंग भरतो.
इथे आणखी एक समांतर पात्र आहे सिल्क स्मिताचे, जी कमल हसनच्या प्रेमात पडलेली आहे. तसे कथानक पुढे न्यायला या पात्राचा काही उपयोग होत नाही; पण एकाच वेळी कमल हसन आणि त्याच्यावर प्रेम करणारी सिल्क स्मिता, दुसरीकडे कमल आणि त्याचे रश्मीवर असणारे अव्यक्त प्रेम. या दोघांच्या मनोविश्वात समान असणारी प्रेमाची अप्रगट भावना अधोरेखित करण्यासाठी कदाचित दिग्दर्शकाने हे पात्र रचले असावे.
नायक रश्मीला एका वैद्याकडे घेऊन जातो. तिथे पोलीस आलेले असतात. तो पुढे जात नाही. वैद्याच्या उपचारांनी ती बरी होते. नंतर त्याला वैद्याकडून कळते की, रश्मी तिच्या आई-वडिलांबरोबर ट्रेनने जाणार आहे. तो डोंगरातून धावत, उडय़ा मारत, घसरत, धडपडत निघतो. त्याला एक कार उडवते. त्याचा पाय मोडतो. चिखलात पडतो. चिखलाने अंग माखते. कपडे माखतात. तोंडातून रक्त येते. तसाच वाकडा चालत तो प्लॅटफॉर्मवर पोहोचतो. गर्दीतून वाट काढतो, तिला शोधतो. ती आता पूर्णपणे सावरलेली आहे. ती आता सात वर्षांची राहिलेली नाही. ती त्याच्याकडे पाहते. त्याला ओळखत नाही. तिला आश्चर्य वाटते. तो मात्र तिला त्याच्या घरात ती असताना त्या आठवणीत नेण्याचा प्रयत्न करतो. माकडासारखे तोंड करून दाखवतो. स्टेशनवर पडलेला हंडा डोक्यावर घेऊन माकडासारखा चालून दाखवतो. तुझ्यासाठी मी काय काय केले हे सगळे कृतीतून सांगतो. आपण ते सगळे पाहताना आपले काळीज पिळवटून निघते. दृश्य पाहताना अंगावर शहारे येतात. दृश्य दिसण्याआधीच त्या दृश्याच्या साठवलेल्या आठवणी आपल्याला दुःखाच्या पुसट वेदना देऊ लागतात. हे दृश्य म्हणजे नायकाच्या शोकांतिकेचे अत्युच्च रूप आहे. ते इतके जिवंत आणि सजीव वाटते की, जणू काही ती शोकांतिका आपण प्रत्यक्षात घडलेली पाहत आहोत. संपूर्ण चित्रपट श्रीदेवीच्या अभिनयाने भारून गेलेला आहे; पण या शेवटच्या दृश्यात कमल हसन श्रीदेवीच्या अभिनयामध्ये स्वतःच्या अभिनयाचे दुःख असे काही पेरतो की, श्रीदेवीच्या अभिनयाच्या आठवणी थोडय़ा काळासाठी धूसर होतात. लक्षात राहतो तो वेडा झालेला, हताश झालेला, पराभूत झालेला नायक सोमू.
चित्रपट इथे संपतो. ज्या दिवशी त्या स्टेशनवर तो रश्मीबरोबर उतरलेला होता त्या दिवशी हळुवार पाऊस पडत होता. आजही त्या स्टेशनवर तसाच पाऊस पडत असतो. त्याची रश्मी त्याच गाडीतून त्याला न ओळखता दोघांच्या मनावर सदमा करून निघून जाते. एक सोमूच्या आणि दुसरा प्रेक्षकांच्या… आणि अभिनयाच्या सुगंधी आठवणी आपल्या मनाच्या कप्प्यात ठेवून आपण पुन्हा एकदा हरवतो… सापडण्यासाठी.
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)




























































