गझलांचा ‘अहवाल’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अरुण मालेगावकर

बहुधा ज्यांच्या हृदयात वेदनांची धर्मशाळा असते, त्यांचा प्रत्येक अश्रुबिंदू आगळा वेगळा असतो. उन्हाचे प्रमाणपत्र घेऊन जन्मणारी माणसे जगण्याचा रंग काजळकाळा घेऊन येतात का? ज्या समाजात सतत संशयी वृत्तीने माणसे वागतात त्यांना आपली खुशाली सांगण्यात काय अर्थ आहे? जिथे लोक हरतात, तिथे आपण जिंकतो, तर लोक जळणारच, तरीही-

कसा सन्मान विश्वाचा पहा मी राखतो आहे।
जगाचे हुंदके माझ्या उरी सांभाळतो आहे।।

ही माणुसकी जपण्याचा मानवधर्म कवी निष्ठsने पाळतो. कुठल्याही पुरस्कारप्राप्तीसाठी तो आटापिटा करीत नाही. आपल्या मातीशी इमान राखून मनाच्या प्रवेशद्वारी जखमांचे उपकार फेडण्याची जिद्द बाळगतो आहे. तो कवी भविष्यकाळाचा नवा उद्गार असल्याने परस्परांना समजून घेण्याचा आग्रह करतो, ही सकारात्मक वृत्ती आशावाद जिवंत ठेवते. अश्रूंचा अहंकार गळून पडला की, आपल्या प्रिय व्यक्तींची आठवण येते.

वादकांशी खेळण्याची सवय आहे,
नाव माझे आठवा, मी प्रलय आहे।

ही धमक कवीत असल्याने भीतीचे भयंकर सावट या कवितेत जराही नाही. उलट तरलता आणि कोमलता या नाजुक भावनांमुळे मनाची सरळता आणि सुंदरताच अधिक अधोरेखित होते. गझलांचा हा वेगळा ‘अहवाल’ मोठमोठय़ा वादळांशी सामना करणारा आहे. तिचा आणि त्याचा रस्ता कितीही लबाड असला तरी बहार आणि पानगळ यांच्या सीमारेषेवर वाचनीय आहे, हेच खरे!

अहवाल
लेखक : प्रशांत वैद्य
प्रकाशन : संवेदना प्रकाशन, पुणे
पृष्ठे : 112, मूल्य : 150 रुपये.