>> अरविंद दोडे
आजकाल चिंतनपर ग्रंथांची निर्मिती फारशी होत नाही, असे ग्रंथपाल सांगतात. ललित लेखसंग्रह प्रकाशित झाले, तरी त्यांचे स्वरूप निबंधासारखे असते किंवा माहितीपर असते. मात्र व्यक्तिचित्रे अधिक वाचनीय असतात. वृत्तपत्रांतील रविवारीय पुरवणीत प्रसिद्ध होणाऱया लेखांचे संग्रह मोठय़ा प्रमाणात छापले जातात. अशाच लेखांचा ‘चिंतनझुंबराची प्रकाशवलये’ हा संग्रह ‘संवेदना’तर्फे प्रकाशित झाला आहे.
लेखक जर कविमनाचा असेल आणि त्याच्या विचारांना आध्यात्मिक बैठक असेल तर त्या लेखनात चिंतनाचा रंग उतरतो. अशोक गुप्ते यांना हे वांशिक धन लाभले आहे. ‘चाफा बोलेना’कार कविराज ‘बी’ हे अशोकरावांचे आजोबा. हा वारसा जपताना प्रासादिक गुणवत्ता पुरेपूर दिसून येते. प्रसन्नतेचा मळा फुलविणारा हा कनकचंपकाचा ‘कळा’ फारच परिपक्व आहे. साधारणतः आरंभी ललित लेख आहेत. मध्य भागात ललितसंदेशपर आणि अखेरीस ललितरम्य व्यक्तिचित्रे आहेत. एकंदर लेखनाचा बाज वाचकांना समृद्ध करणारा असून रंजकता हा याचा प्रधान गुण आहे.
‘वासांच्या सहवासात’मध्ये पंचविषयांपैकी एक ‘गंध’ गुणावर केलेले चिंतन अखेरीस ‘गुरुप्रसादा’पर्यंत येऊन पूर्ण होते. ‘तारुण्याचा ताठा, लावण्याचा गर्व, होती शून्य सर्व, शिशिरात’ हा अनुभव वयोमानानुसार येतो. तेव्हा सांजसोबती थांबलेले दिसतात. पानगळीतही आनंद शोधणारी ज्येष्ठ माणसे डोळसपणे जगाकडे प्रफुल्लितपणे पाहतात. प्रस्तुत संग्रहात समर्पक कवितेच्या ओळी असल्याने विषयाचे सौंदर्य वाढवतात. आठ प्रहरांचा हिशेब मांडताना कविता सुचण्याचा प्रहर अत्यंत लोभसवाणा असतो. हे पटवून देताना कवीचे रितेपण आणि भरलेपण हे दोन्ही आत्मानुभवाचे प्रत्ययकारी चित्रण करतात. प्रत्येकाची अध्यात्मविद्या वेगळी असू शकते. राजसगुणाला सात्त्विक गुणाचा टिळा लावावा तसे हे सारे लेखन आहे. उर्दू शायरीचा परिसस्पर्श लाभल्याने याची खुमारी अधिकच बेहतरीन झालीय. ‘मनाचा निर्मळ’, ‘तुटे वाद’, ‘समाधानी संध्यासमय’, ‘अतिलीनता’, ‘कचकडय़ांचे आस्तिक’ आदी लेख अधिक उल्लेखनीय आहेत. कवी आणि कलाकार एकाच व्यक्तीत शोधताना अशोक गुप्ते विचारांचा गुंता होऊ न देता हळुवारपणे सोडवतात आणि कलावंताच्या मनस्वी स्वभावाचे अदृश्य पैलूंवर प्रकाश पाडून सारी सुरेख वलये वैभवी पातळीवर आणून ठेवतात, हेच या चिंतनाचे चैतन्य आहे!
चिंतनझुंबराची प्रकाशवलये/लेखसंग्रह
लेखक : अशोक गुप्ते
प्रकाशक : संवेदना प्रकाशन, पुणे 33.
पृष्ठे : 176
मूल्य : रुपये 250/-