
>> आश्लेषा महाजन
येत्या रविवारी ‘‘माझ्याकडे ‘शुक्रवारची सवाष्ण’ म्हणून तू येशील का?’’ माझ्या एका मैत्रिणीने मला विचारले, तेव्हा मी गोंधळून गेले. ‘शुक्रवारची सवाष्ण – रविवारी?’ अर्थात, नोकरीत एवढय़ा तेवढय़ा गोष्टींसाठी रजा न मिळणे, रजा संपणे, त्याच शुक्रवारी कार्यालयातल्या अनेकींनी रजा काढल्याने तडजोड करणे अशा अनेक बाबी त्यामागे असतात. सवाष्ण, कुमारिका, विधवा, घटस्फोटिता, परित्यक्ता, एकटी ही पुरुषसापेक्ष विशेषणेही आजकाल औचित्यपूर्ण नाहीत. स्त्री असणे, माणूस असणे ही एकच गोष्ट जेवायला बोलवण्यासाठी पुरेशी नाही का? मग ती कोणत्याही जाती-धर्माची असो. कुणालाही, कुठल्याही वारी जेवायला बोलावले तरी त्या व्यक्तीचा जठराग्नी तृप्तच होईल. त्या व्यक्तीला बरे वाटेल. सोमवार ते रविवार हे आपल्या सोयीने केलेले सप्ताहाचे विभाग आहेत. त्यामुळे खरे तर सगळेच दिवस सारखे नि शुभ. एखाद्या किंवा अनेक व्यक्तींना बरे वाटेल असे माणुसकीने वागणे म्हणजे स्वधर्म वा परंपरा पाळणे अशी साधी-सोपी व्याख्याही करता येते.
रुढी-परंपरांचा अभिमान बाळगून त्यांचा अंगीकार करावा की त्यातील कालबाह्य बाबी वगळून त्यांची नवी मांडणी करावी की त्यातील फोलपण जाणवल्याने त्या झुगारून द्याव्यात नि नवीच जीवनशैली आत्मसात करावी की त्यांचे पुनर्मूल्यांकन करावे? असे प्रश्न विचारी माणसाला नेहमी पडत असतात. समाजामध्ये काही बाबतीत कडवा स्त्राrवाद तर काही ठिकाणी सोयिस्कर परिस्थिती शरणता दिसते. काही स्त्रियांमध्ये समन्वयाची मध्यममार्गी भूमिकाही दिसते. काहींनी पुरुषप्रधान संस्कृतीचे द्योतक असलेले मंगळसूत्र न घालण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. काहींना तो प्रतीकात्मक दागिना खूपच जिव्हाळ्याचा वाटतो. मंगळसूत्र घालणे न घालणे ही गोष्ट आता प्रगत समाजात परंपरेकडून फॅशनकडे झुकलेली आहे, असे दिसते. नामवंत सराफांनी दिलखेचक जाहिरातींच्या माऱयांनी स्त्रियांच्या या ‘सौभाग्य’ दागिन्याचे बाजारीकरणही केलेले दिसते. मंगळसूत्राला – नवरा, लायसन्स, जू, हॉल तिकीट, लोढणे अशी अनेक हास्यास्पद नावे आहेत. शिवाय चित्रपट व टी.व्ही. मालिकांमधील भडक दागिन्यांना मागणी वाढते आहे. मुळात एखादा दागिना परिधान करण्याचा उद्देश काय, त्याची प्रस्तुतता आज शिल्लक राहिली आहे का, मंगळसूत्र घातल्यानेच नवऱयावरचे प्रेम सिद्ध होते का, बायकोविषयीचे प्रेम दाखवण्यासाठी नवरा कोणता दागिना मिरवतो का, काळे मणी आणि मधोमध दोन सोन्याच्या वाटय़ा असे वर्णन असलेला हा दागिना मुळात बायकांच्या गळ्यात आला कधी? हा संशोधनाचा विषय आहे. कारण पुराणग्रंथांमध्ये, त्यातील विवाहसोहळ्यांमध्ये, शिल्पांमध्ये हा विशिष्ट दागिना दिसत नाही. याचा अर्थ विवाहित स्त्राrच्या गळ्यात बऱयापैकी अर्वाचिन काळात ही माळ पडलेली आहे. कालांतराने ती माळ- सौभाग्यसूचक मंगळसूत्र म्हणून लोकप्रिय झाले. हिंदुस्थानी स्त्राrचे व्यवच्छेदक लक्षण झाले. काहीही असो, एखाद्या स्त्राrला मंगळसूत्र घालावेसे वाटले, तर ते तिने घालावे. एखाद्या प्रौढ कुमारिकेला वा विधवेला वाटले तर तिनेही मंगळसूत्र घालावे. एखाद्या दिवशी मंगळसूत्र घालू नये, मोत्याची माळ वा साखळी घालावी वाटेल, तिची पसंती. मंगळसूत्राला बँकेत लॉकरचा धनी करावे व बेन्टेक्सला जवळ करावे वाटेल, तिचा प्रश्न! गळ्याजवळचे छोटेसे वा बेंबीपर्यंत लांबलचक मंगळसूत्र घालावे, हा तिच्या ऐपतीचा वा अभिरुचीचा मामला. देह बाईचा, गळाही तिचा, आरसा तिचा, कंफर्ट तिचा, इच्छा वा अनिच्छा तिची, मूड तिचा. त्यामुळे कुठला दागिना वा कपडे घालायचे, हे तिचे तिला ठरवता यायला हवे. या गोष्टीकडे कुटुंबाने, समाजाने स्वच्छ दृष्टीने पाहायला शिकले पाहिजे. एखाद्या स्त्राrला हळदी-कुंकवाची ऍलर्जी असली तर तिने ते लावू नये. कारण रुतते ती रूढी! जिथे काही रुतते, तिथे घर्षण असते, जाच असतो, काच असतो, जखम असते.
जिन्स-टीशर्ट घातल्याने कुणी स्त्री मॉडर्न होतेच असे नाही नि साडी नेसली म्हणून ती काकूबाई ठरत नाही. कडवा फेमिनिझम जसा घातक ठरू शकतो, तसा भाबडा देवभोळेपणाही घातकच. कुठल्याही प्रथेकडे स्वच्छपणे, त्याच्या मूळ स्वरूपाचा विचार करून पाहता आले तर रुढींची बेडी होणार नाही. पण तसे होत नाही नि मग एखादी खेडवळ सासू सुनेने झोपताना मंगळसूत्र काढून ठेवले म्हणून तिला घालून पाडून बोलते. ‘आपल्या घराण्यात बाईने असेच कुंकू लावायचे असते,’ असा दंडक घातला जातो. एखादीचा नवरा गेला की म्हणे तिला जोडवी घालता येत नाहीत, हिरवी साडी तिला वर्ज्य! रूढी पाळणे, न पाळणे यात पापपुण्याचा, शाप-भोगाचा, शुचितेचा भाग असता कामा नये. एखादी रूढी पाळताना स्वयंस्फूर्तीचा, आनंदाचा, आवडीचा, सहजतेचा, कंफर्टचा आणि आरोग्याचाही विचार असायला हवा. अन्यथा मानेवर एक्झिमा वा खरूज झाली तरी घराण्याच्या इभ्रतीपायी गळ्यात चार-चार माळा नि मंगळसूत्रे घालण्याचा आटापिटा केला जातो. पायाच्या बोटांत चिखल्या झाल्या तरी सौभाग्यसूचक जोडवी काढण्याचे धारिष्टय़ बायांना होत नाही, हे दुर्दैवी आहे.
खूपदा एखादी कालबाह्य रूढी बंद करण्यासाठी नवी रूढी रूढ होत जाते आणि त्या नव्या रूढीची बेडी समाजाला आवळू लागते. एखादी अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी काही उपाय करावा तर त्याचीच नवी अंधश्रद्धा निर्माण होत नाही ना, हे पाहावे लागते. रूढीशिवाय समाज नसतोच. पण कालबाह्य, त्याज्य, दुष्ट आणि हास्यास्पद रूढी बंद करून नवे विवेकी पायंडे पाडणारा समाज प्रगती करतो.




























































