साहित्यकट्टा : भटकंतीतला लेखनप्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>आशुतोष बापट

इतिहासातील शास्त्रशुद्ध संदर्भ लाभले की ही भटकंती अभ्यासपूर्ण होते. इंंडॉलॉजी आणि इतिहासाच्या अभ्यासाची जोड देत केलेली भटकंती शब्दरूपात मांडणारे लेखक, अभ्यासक आशुतोष बापट यांचे दहावे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. मंदिर स्थापत्य, मूर्तीशास्त्र, वारसास्थळांचे महत्त्व, सह्याद्रीमधील गडकिल्ले, महाराष्ट्रातील आडवाटेवरची भ्रमंती अशा वैविध्यपूर्ण विषयांवरील त्यांची पुस्तकं लोकप्रिय ठरली आहेत. दहाव्या पुस्तकाच्या निमित्ताने भटकंतीतला हा लेखनप्रवास कसा झाला हे त्यांच्याच शब्दात मांडणारा हा लेख.

संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे. महाजनस्य संसर्गः कस्य नोन्नतीकारकः, पद्मपत्रस्थितंतोयं धत्ते मुक्ताफलश्रियं। याचा अर्थ असा की, थोर लोकांच्या संपर्कात आल्यामुळे कुणाचं भलं होत नाही? कमळाच्या पानावर पडलेल्या पाण्याच्या थेंबालासुद्धा मोत्याचं रूप प्राप्त होतं. माझ्या लिखाणाच्या बाबतीत आणि भारतीय विद्येच्या अभ्यासाच्या बाबतीत अगदी असंच झालं. कॉलेजमधे असल्यापासून डोंगर, किल्ले, हिमालय अशी स्वान्त सुखाय भटकंती सुरू होती. पुढे प्र. के. घाणेकर सर, देगलूरकर सर यांच्याशी ओळख झाली. या लोकांचा अभ्यास आणि त्यांचे सहेतुक फिरणे बघायला मिळाले आणि सुदैवाने त्यांच्यासोबत खूप हिंडायलासुद्धा मिळाले. देगलूरकर सरांबरोबर अनेकदा मराठवाडय़ातली मंदिरे आणि विविध वारसा स्थळे बघण्याचा योग आला. अशाच एका भटकंतीमध्ये सरांनी भारतीय प्राच्य विद्या म्हणजेच इंडॉलॉजीचा, टिळक महाराष्ट्र विद्यापीठात असलेला 2 वर्षांचा अभ्यासक्रम करण्यासाठी सुचवले. सरांसोबत हिंडणे सुरू होतेच, त्या जोडीला हा अभ्यासक्रम सुरू झाला आणि एक मोठा खजिनाच गवसला. सरांसोबत फिरल्याने मंदिर स्थापत्य आणि मूर्तिकला यांचे दर्शन होत होतेच. या सगळ्याचा इतिहास, प्राचीन राजवंश आणि मूर्तिशास्त्र या विषयासोबत विविध प्राचीन भारतीय विद्येची ओळख या अभ्यासक्रमामुळे झाली. प्र. के. घाणेकर सरांसोबत हिंडताना डोळस भटकंती कशी करायची. एखाद्या ठिकाणाचा इतिहास कसा जाणून घ्यायचा आणि नेमकं काय बघायचं ही दृष्टी मिळाली. कॉलेजकाळापासून कुठलाही ट्रेक असो, सहल असो त्याची डायरीत सविस्तर नोंद करण्याची सवय होती. उद्देश हाच की दुसरा कुणी त्या ट्रेकला जाणार असेल तर त्याला नीट सविस्तर माहिती देता यावी. 2014 पासून पुण्यातल्या ‘प्रभात’ वृत्तपत्रातून लिहायची संधी मिळाली. रोज एक लेख अशी 8 महिन्यांची मालिका लिहिली गेली. त्याच वेळी ‘लोकप्रभा’ आणि ‘लोकसत्ता’ इथेसुद्धा लिहायची संधी मिळाली होती. तिथे तर आडवाटेवरचे गणपती, आडवाटेवरच्या देवी, मारुती, दत्त आणि अशा विविध पर्यटन विषयावर लिहायची संधी विनायक परब सरांमुळे मिळाली. त्यातूनच पुढे ‘लोकसत्ता’मध्ये ‘आडवाटेवरची वारसास्थळे’ अशी वर्षभराची मालिका सुरू झाली. त्यानंतर भटपंती दोन दिवसांची, चिंब भटपंती अशी सदरे लिहिता आली. महाराष्ट्र अनलिमिटेड, प्रसाद, साप्ताहिक सकाळ इथे लिखाण सुरू झाले

एकदा अंबरनाथला स्नेहल प्रकाशनाच्या श्री. रवींद्र घाटपांडे यांच्यासमवेत गेलो असताना अकस्मात घाटपांडे म्हणाले की, तुझं एक पुस्तक करायचं आहे. कशावर करणार पुस्तक? असं विचारल्यावर ते म्हणाले की, इतके दिवस जे कुठे कुठे लिहीत आहेस ते संकलित करूया. खरं तर हा धक्काच होता आणि कोण वाचणार हे सगळं याबद्दल शंकाही मनात आली. मात्र घाटपांडे यांनी आग्रहच धरला आणि पुण्याला आल्यावर विविध लेख, त्यात बरीचशी भर घालून, बदल करून काही लिखाण तयार केलं. आणि त्याचं पाहिलं पुस्तक झालं ते ‘सफर देखण्या महाराष्ट्राची.’ 28 मार्च 2015 रोजी त्याचं प्रकाशन झालं. त्याच वेळी देगलूरकर सर, घाणेकर सर आणि निनाद बेडेकर सरांच्या पुस्तकाचेही प्रकाशन झाले. इतक्या थोर लोकांच्या पंगतीत बसायचा मान मिळाला हे केवढे नशीब.मग हंपी-बदामी, ओडिशा, कंबोडिया, महाराष्ट्रातली शिल्पसमृद्ध शिवमंदिरे अशी पुस्तके लिहिली गेली. ओडिशा पुस्तक लिहिताना तिथले राजवंश, तिथले स्थापत्य, तिथल्या दंतकथा असे विविध विषय घेतले. ‘भटकंती आडवाटेवरची’ हे पुस्तकसुद्धा हिंदुस्थानातील अनगड ठिकाणांच्या भटकंतीवर प्रकाशित झाले.

विनायक परब सरांनी एक विषय सुचवला होता. नदीच्या उगमापासून ते ती दुसऱ्या मोठय़ा नदीला किंवा समुद्राला मिळेपर्यंत वाटेत असणाऱ्या विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक घटनांची, वारसास्थळांची ओळख करून देणारी लेखमालिका ‘लोकप्रभा’साठी हवी होती. त्या त्या प्रदेशात हिंडणे पूर्वीच झाले होते. पण आता जास्तीचे वाचन आणि पुन्हा हिंडायची गरज होती. ते सगळे करत करत ‘नदीच्या खोऱयात’ ही मालिका वर्षभर ‘लोकप्रभा’मध्ये प्रकाशित झाली. महाराष्ट्रातील 22 नद्या या पुस्तकात समाविष्ट केलेल्या आहेत. याचे स्वागत अनेक मंडळींनी केले.

म्हणता म्हणता 10 वे पुस्तक होण्याची वेळ आली. आणि तो योगसुद्धा फार रोमांचक आला. सह्याद्री म्हणजे किल्ले हे समीकरण सर्वत्र आहे. मात्र या दुर्गांच्या पलीकडेसुद्धा सह्याद्रीत बघण्या-अनुभवण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. या विविध गोष्टींवर लिहायला पाहिजे असे घाणेकर सरांचे मत होते. यावेळी हाच विषय आम्ही दोघांनी संयुक्तपणे लिहून त्याचे ‘दुर्गांपलीकडचा सह्याद्री’ हे पुस्तक झाले. ज्यांची पुस्तके वाचून ट्रेकिंगला सुरुवात केली अशा घाणेकर सरांसह पुस्तक लिहायची वेळ येईल असे कधीही वाटले नव्हते. तो योग जुळून आला. मी तर त्याला ‘गुरुशिष्यामृत योग’ असे म्हणतो. देगलूरकर सरांना जेव्हा या दहाव्या पुस्तकाबद्दल समजले तेव्हा ते सहज म्हणाले की, आता तू ‘दशग्रंथी’ होणार!

प्रत्येक पुस्तकागणिक भाषा परिपक्व होत गेली. नेमकेपणावर भर दिला गेला. आणि सहजसोप्या भाषेत कुठलाही विषय मांडायचा कसा हे जाणवू लागले. प्रत्येक पुस्तक हे जरी पर्यटन या विषयाला वाहिलेले असले तरीही त्यात इंडॉलॉजीचा प्रभाव प्रकर्षाने जाणवू लागला. आपले लिखाण हे जास्तीत जास्त संदर्भाने समृद्ध असायला हवे याची जाणीव होत गेली आणि तीच पुस्तकात लिखाणाच्या रूपाने अवतरू लागली. इंडॉलॉजीच्या अभ्यासाचा भटकंतीसाठी फार मोठा उपयोग झाला. भटकंती डोळस झाली, तिला इतिहासाचा शास्त्रशुद्ध अभ्यासाचे अधिष्ठान लाभले आणि ते पुस्तकांच्या रूपाने लोकांसमोर मांडता आले याचे नक्कीच समाधान आहे. थोरांच्या सान्निध्यात आल्यामुळे ते लोक एखाद्या गोष्टीकडे कसे बघता आणि तीच गोष्ट लोकांसमोर कशी मांडतात हे अगदी जवळून बघता आले. खरे तर 10 पुस्तके लिहून झाली म्हणजे फार काही मोठे काम झाले नाही याची जाणीव आहेच, मात्र या दहा पुस्तकांच्या प्रवासात आपल्या जाणिवा, आपली दृष्टी कशी विकसित होत गेली हे फार महत्त्वाचे वाटते. यापुढेसुद्धा थोरामोठय़ांचे सान्निध्य आणि त्यांचे आशीर्वाद या जोरावर यापुढील लिखाण सुरू राहील ही खात्री आहे.

[email protected]