
>> बापू दासरी
प्रमाण म्हणविली जाणारी भाषा कितीही आत्मसात केली तरी जिभेवर जन्मापासून बसलेल्या बोलीचे ‘वळण’ माणसाला टाळता येत नाही. ‘मराठवाडी’ बोलीला तिचे म्हणून एक वळण आहे. खास खुमारी आहे. या बोलीत अगणित शब्दांचा लक्षणीय ठेवा आहे. मराठवाड्याची एक वेगळी ढब आणि लकब असलेली ही बोलीभाषा ही तिच्या रांगडेपणामुळे आणि आपुलकीच्या ओतप्रोत ओलाव्यामुळे जगप्रसिद्ध आहे. तिचा ठसा उमटला आहे. या मातीतला हा रांगडेपणा भाषावैविध्यामध्ये आपल्याला दिसून येतो.
मराठवाड्याची एक वेगळी ढब आणि लकब असलेली मराठी बोलीभाषा ही तिच्या रांगडेपणामुळे आणि आपुलकीच्या ओतप्रोत ओलाव्यामुळे जगप्रसिद्ध आहे. मराठवाडी बोलीभाषेत व इथल्या मातीत कलागुण हे उपजतच मिसळलेले आहेत आणि इथे जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती ही कलाकार आहेच. जे व्यक्त होतात ते कलाकार म्हणून प्रसिद्ध होतात आणि जे व्यक्त होत नाहीत ते कलाकार मूक रसिक म्हणून इतरांच्या कलेचा आस्वाद घेत राहतात हाच मराठवाड्याच्या मातीचा उपजत स्वभाव म्हणावा लागेल.
घरात अठरा विश्वे दारिद्र्य असले तरी आलेल्या पाहुण्याला मस्त शिव्या घालून त्याचे स्वागत करून ‘‘मायला किती दिवसानं आलास बे तू!’’ असं म्हणून मानमरातब राखून त्याला आहेर करणे हे मराठवाडी संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. आपल्या घरात काही असो नसो, पण बाहेर मात्र आपली फार मोठी इज्जत आहे या आविर्भावात मराठवाड्यातला रांगडा मराठी माणूस हा रांगडा मध्यमवर्गीय माणूस म्हणून जगत असतो. मराठी माणसाला जिव्हाळा, प्रेम, आपुलकी या गुणांचे वरदान उपजतच प्राप्त झाले आहे. दुसऱ्याच्या दुःखाला सजवून त्याचे भांडवल करून आपली पोळी भाजून घेणे हे मराठवाडी संस्कृतीला मान्य नाही. पुण्या-मुंबईचा मराठी माणूस चुकून कधी जर मराठवाड्यात आला तर त्याच्या शुद्ध भाषेचे वस्त्रहरण एका झटक्यात मराठवाडी माणूस करत असतो आणि आपल्या रांगड्या अशुद्ध मराठी भाषेत बोलून आपला स्वाभिमान आणि त्याचा तोरा तो मिरवल्याशिवाय राहत नाही.
लहानपणी आम्ही काही चुकलो की, आम्हाला बद्दय़ाने झोडपून काढत असत. हा बद्दा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून एक वेताची छडी होती! त्या काळी दिवेलागणीला परवंचा म्हणण्याचा शिरस्ता असे. परवंचा म्हणजे मुपाठ पाढे म्हणणे. आमची आणि आमच्या दोन बहिणींची पाढे म्हणण्यासाठी स्पर्धा चालायची. आईने वृंदावनाजवळ दिवा लावला की, तिन्हीसांजेला आम्ही परवंचा म्हणत असू. मग पाढे पाठ असल्याचा आविर्भाव करत असू. मग एक पाव पाव, बे पाव अर्धापर्यंत आलो की, अवसान गळून जात असे आणि मग छडीचा प्रसाद ठरलेला असे. आमचे काका आमच्या चुकांवर लक्ष ठेवूनच असत. करायलाय, भरायलाय, ठेवायलाय, यायलाय ही आमची जिव्हाळ्याची क्रियापदं.
एखाद्याच्या मुलाने चांगले गुण मिळवले, म्हणजे साठ-पासष्ट मार्क मिळाले की, त्याचा खूप बोलबाला असे. गावात कुणाकडे पाहुणे आले की, त्यांना त्याची पिशवी खांद्यावर घेऊन बस स्टँडवर सोडायला जाणे हा एक अलिखित नियम होता. पाहुण्याला बस/ ट्रेनच्या खुर्चीवर नेऊन बसवले की, तो स्वतःहून खुशीने दहा-पंधरा पैसे खरमुरे खायला देत असे. मग आम्ही ‘त्याला पोचविलं’ असं म्हणत असू. अभ्यास करणे म्हणजे पाठांतर करणे असा गोड गैरसमज होता. विषय तुम्हाला समजला की नाही समजला याचे काही देणे घेणे नसे. फक्त गडय़ाला किती पाठ आहे यावरून त्याची गुणवत्ता ठरवली जात असे. पाठ झाले म्हणजे त्यानं ‘खूप हुशार हाय वो’ अशी म्हणण्याची पद्धत होती.
आपल्या जिभेवर बसलेली भाषा आणि आपण या दोन्ही गोष्टी एकजीव असतात. प्रमाण म्हणविली जाणारी भाषा कितीही आत्मसात केली तरी जिभेवर जन्मापासून बसलेल्या बोलीचे ‘वळण’ माणसाला टाळता येत नाही. ‘मराठवाडी’ बोलीला तिचे म्हणून एक वळण आहे. खास खुमारी आणि या बोलीतील अगणित शब्दांचा लक्षणीय असा ठसा आहे. दुष्काळ हल्ली सार्वत्रिक होऊ लागला, पण मराठवाड्याला दुष्काळाची झळ जरा अधिक बसत राहिली. खायलाच काही मिळत नाही. त्यासाठी ‘मिडकणे’ यासारखे क्रियापद वापरात असते किंवा एकजण काहीएक खात आहे आणि दुसरा त्याच्याकडे फक्त पाहत आहे. त्यासाठी ‘टोकनी लागणे’ किंवा का घुरायलास उगीच’ हा शब्दप्रयोग. ‘दृष्ट लावू नको उगा’ असं म्हणलं जायचं! जेवण झाल्यावर ताटात सोडलेल्या अन्नाला माजोरडा माजलाय असे म्हणतात. असे अन्न वाया जाताना ‘जानोडा करू नका’ असा सल्ला लहान मुलांना वयस्कर देत असतात!
स्टीलचं असो की पितळी, पातेलं ते पातेलंच, पण भगोनं या शब्दातील अपार आपुलकी आपोआप ध्वनित होते. पातेलं रिकामं असू शकतं, पण भगोन्यात मात्र नक्की काही ना काही असायलाच पाहिजे ही सकारात्मकता या मातीचे प्रतीक आहे. लातूर, धाराशीवच्या काही भागातील शब्द काय करलाव : काय करता, जेवताव काय : जेवण करता का? जातुसकी : जातोस का?, इथोर कसा आलास भाऊ ? म्हणजे इथपर्यंत कोणत्या गाडीने आपण आला आहात? ‘कोणीतरी मणलं बुवा माईच्यान’ या नावाखाली कोणतीही माहिती बिनबोभाटपणे खपविली जाते. कोणतरी मणलं म्हणजे ‘कोणीतरी सांगितलं मायच्यान’ म्हणजे आईची शपथ भाऊजीला दाजी, काकाला चुलता आणि अहो जाओ ऐवजी अरेतुरेवर अधिक भर. खलबत चालू म्हणजे सभा चालू पण खलबत म्हणजे फक्त चुकीचे काम करण्यासाठी मिटींग घेणे, खातरजमा करणे म्हणजे खात्री करणे, काम करण्यासाठी काही संधी आहे का असे म्हणायचे असेल तर गुंजाईश आहे का असे म्हटले जाते. एखादं पोरगं किंवा पोरगी खूप खोडकर आहे तर महा इब्लीस आहे कार्ट / कार्टी असा वाक्प्रचार प्रचलित आहे.
आपुलकीने बोलणे म्हणजे सहज शिवी देणे हाही एक प्रघात. काय बगालेव म्हणजे काय पाहतेस. त्याची हिवशीच केली म्हणजे त्याची खोड मोडली जिरवली. त्याची इचकून टाकली म्हणजे काम विस्कटून टाकले. मोठा माठ किंवा रांजण असेल तर त्याला डेरा हा शब्द प्रचलित आहे. बिनगी हा शब्द छोट्या मातीच्या कळशीला म्हटला जातो. येळणी म्हणजे चिमण्यांना पाणी पिण्यासाठी ठेवतात ती खापरी परात. एकदम लहानसा तांब्या असेल तर त्यास बुडगं म्हटलं जातं. प्याला असेल तर त्याला लोटा म्हटलं जातं.
मराठवाडी शब्द हे जरी पारंपरिक पद्धतीने आपल्या जिभेवर संस्कारित जन्मापासून झाले असले तरी वाढत्या शहरीकरणामुळे आणि मीडिया व ग्लोबलायझेशनमुळे हा शब्दठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे! कारण इंग्रजी शाळेत मुलांना शिकविण्याची फॅशन विकसित झाल्यामुळे, हा ठेवा कोणत्याही मराठी भाषेच्या अभ्यासकांनी शब्दकोश तयार करून आजीवन अमर करावा, असे वाटते! आटत चाललेली माया, प्रेम आपुलकी आणि स्वकेंद्री होण्याच्या वाढत्या सवयींमुळे, हा ठेवा कुठेतरी जपला जावा अशी एक मनात खंत आणि या सर्व शब्दांच्या सोबत आपल्या मनाच्या अंतःपटलावर कोरल्या गेलेल्या अनेकविध प्रतिमा मात्र जसच्या तशा आपल्या मनात शाबूत आहेत हे मात्र नक्की!





























































