
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध योजलेले आतापर्यंतचे उपाय आणि एअर स्ट्राईक प्रभावी असले तरी पाकिस्तानच्या दहशतवादी विचारसरणीला आणि त्यांच्या कारवायांना कायमस्वरूपी थांबवण्यासाठी आणखी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे पारंपरिक युद्ध म्हणजेच पाकिस्तानी सैन्यावर थेट हल्ला कधी होणार? भारत पाकिस्तानविरुद्ध एका बहुआयामी युद्धात उतरला आहे. मात्र तेवढे पुरेसे नाही.
पाकिस्तानने पहलगाममध्ये केलेल्या दहशतवादी हल्ल्याला 7 मे रोजी 15 दिवस पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तानशी केवळ पारंपरिक पद्धतीने नव्हे, तर विविध स्तरांवर आणि अनेक प्रकारच्या ‘युद्धां’च्या माध्यमातून लढत आहे, ज्याला ‘मल्टिडोमेन युद्ध’ म्हटले जाते. भारताने दिलेला प्रतिसाद जलद आणि बहुआयामी होता, ज्यामध्ये राजनैतिक, आर्थिक, लॉजिस्टिक उपाययोजना, सिंधू जल कराराचे निलंबन, पाकिस्तानमधून आयातीवर पूर्ण बंदी आणि पाकिस्तानी जहाजांवर निर्बंध, अटारी जमीन सीमा क्रॉसिंग/व्यापार बंद करणे, राजनैतिक संबंधांचा दर्जा कमी करणे, राजनैतिक अधिकाऱयांची हकालपट्टी आणि पाकिस्तानी व्हिसा रद्द करणे, पाकिस्तानी विमानांसाठी भारतीय हवाई क्षेत्र बंद करणे, पंतप्रधान मोदी यांचे सशस्त्र दलांना ‘पूर्ण ऑपरेशनल स्वातंत्र्य’ देणे, सैन्य सीमेवर तैनात करणे, पाकिस्तानी व्यक्ती आणि माध्यमांचे सोशल मीडिया अकाऊंट ब्लॉक करणे यांचा समावेश होता. यामध्ये आर्थिक युद्ध, व्यापार युद्ध, आंतरराष्ट्रीय स्तरावरची मुद्देगिरी, पाणी युद्ध, मानसिक युद्ध, सायबर युद्ध आणि इतर अनेक अप्रत्यक्ष युद्धांचा समावेश आहे.
1980 पासून पाकिस्तानने 20 पेक्षा जास्त वेळा आयएमएफकडून बेलआऊट पॅकेजेस घेतली आहेत. प्रत्येक बेलआऊटमुळे काही काळ स्थिरता येते, पण आवश्यक बदल पुढे ढकलले जातात किंवा कमी केले जातात. 2023 पासून पाकिस्तानसमोर गंभीर आर्थिक संकट आले आहे. आज भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे. या आर्थिक वर्षामध्ये भारताची अर्थव्यवस्था 6.6 टक्के वाढण्याची अपेक्षा आहे. भारताकडे 688 अब्ज डॉलरपेक्षा जास्त साठा आहे. हा साठा 11 महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसा आहे. त्यामुळे भारत आर्थिक संकटांना चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो. भारत ही जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल. मात्र याचवेळी पाकिस्तान अर्थव्यवस्थेचा वेग कमी झाला असून तो 2.6 टक्क्यांवरून 2.3 टक्क्यांवरती आला आहे, असे मूडीज रेटिंग एजन्सीने सांगितले आहे.
एका आर्थिक अंदाजाप्रमाणे सैन्य हाय अलर्टमध्ये असल्यामुळे पाकिस्तान दर दिवशी चार अब्ज पाकिस्तानी रुपये खर्च करत असावा. चीनकडून नवीन शस्त्र, दारूगोळा विकत घेणे हे पाकिस्तान सध्या कर्ज घेऊन करत आहे. यामुळे येणाऱया काळामध्ये तो चीनचा पूर्णपणे आर्थिक गुलाम होऊ शकतो.
भारताने पाकिस्तानला एकाच वेळी तीन वेगवेगळ्या आघाडय़ांवर लढण्यास भाग पाडले आहे. पहिली आणि सर्वात महत्त्वाची युद्ध आघाडी म्हणजे भारत-पाकिस्तान सीमा. या सीमेवर दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहे आणि तणावपूर्ण परिस्थिती आहे. दुसरी आघाडी आहे पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा. या भागात पाकिस्तानला तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) आणि इतर दहशतवादी गटांकडून मोठय़ा प्रमाणात आव्हान मिळत आहे. तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची आघाडी पाकिस्तानच्या आत बलुचिस्तान आणि वझिरिस्तानमध्ये आहे. या प्रांतांमध्ये तेथील स्वातंत्र्य चळवळी चालवणाऱयांविरुद्ध पाकिस्तानचे सैन्य लढत आहे. भारताच्या धोरणांमुळे पाकिस्तानला एकाच वेळी अनेक ठिकाणी आपले सैन्य आणि संसाधने गुंतवून ठेवावी लागत आहेत.
पाकिस्तानमध्ये अंतर्गत सुरक्षेच्या हिंसाचारामुळे आतापर्यंत 17636 हिंसाचाराच्या घटनांमध्ये 22,185 सामान्य नागरिक, 9546 पाकिस्तानी सैनिक, 35,977 दहशतवादी मिळून 70920 इतके मारले गेले आहेत .2025 च्या चार महिन्यांमध्येसुद्धा हिंसाचार फार वाढला आहे. याचा अर्थ पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानामुळे प्रचंड नुकसान होत आहे. अशावेळी भारतामध्ये पुठेही हिंसक आंदोलने व्हायला नको. रस्ते, रेल्वे लाईन बंद करणे अजिबात होऊ नये. प्रत्येक भारतीयाने ते ज्या ज्या क्षेत्रात काम करतात, तिथे चांगले काम करून भारताची अर्थव्यवस्था अजून जास्त मजबूत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अर्थातच चिनी मालावर बहिष्कार टाकलाच पाहिजे. आजूबाजूच्या जागांवरती लक्ष ठेवून सुरक्षा दलाचे कान आणि डोळे पण बनावे, ज्यामुळे आपल्या भागात काही धोका निर्माण झाला तर त्याची खबर आपण पोलीस आणि इतर सुरक्षा एजन्सीला देऊ शकतो.
भारताची लढाई ही पाकिस्तानच्या शिवाय चीनबरोबर, पाकिस्तानला मदत करणाऱया भारतामधल्या त्यांच्या हस्तकांच्या विरुद्धसुद्धा आहे. ही लढाई लढायला वेळ लागेल. आपण एका लंब्या लढाईची तयारी करायला पाहिजे. पाकिस्तानच्या बरोबर होणाऱया लढाईमध्ये देशभक्त नागरिकांची भूमिकासुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. आपण या आपत्काळी देशाची अंतर्गत सुरक्षा अजून जास्त मजबूत करायला पाहिजे, ज्यामुळे सैन्य मागे वळून न बघता आपले काम चोख बजावू शकेल.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध योजलेले आतापर्यंतचे उपाय आणि एअर स्ट्राईक प्रभावी असले तरी पाकिस्तानच्या दहशतवादी विचारसरणीला आणि त्यांच्या कारवायांना कायमस्वरूपी थांबवण्यासाठी आणखी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे पारंपरिक युद्ध म्हणजेच पाकिस्तानी सैन्यावर थेट हल्ला कधी होणार? भारत पाकिस्तानविरुद्ध एका बहुआयामी युद्धात उतरला आहे. विविध स्तरांवर आणि अनेक प्रकारच्या अप्रत्यक्ष युद्धांच्या माध्यमातून पाकिस्तानवर दबाव वाढवला जात आहे. त्याला तीन आघाडय़ांवर लढण्यास भाग पाडण्यात आले आहे, ज्यामुळे त्याची आर्थिक आणि लष्करी ताकद विभागली गेली आहे. पारंपरिक युद्ध हा नेहमीच शेवटचा पर्याय असतो. सध्याचे उपाय निश्चितच महत्त्वाचे आहेत, परंतु पारंपरिक युद्धाचा पर्याय अपरिहार्य आहे.