>> धनंजय पळसुले
आजवरच्या माझ्या ज्योतिष शास्त्राच्या समुपदेशक म्हणून काम करण्याच्या वाटचालीत असे भरपूर प्रसंग वा खूप चित्रविचित्र माणसे भेटलीत. त्याचाच हा लेखाजोखा …
हे असं तुमच्या सोबतही होतं का? म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर किंवा आपल्या लोकांबरोबर हसत खेळत गप्पा मारत असता नि एका क्षणी तुमच्याही नकळत तुम्ही गप्प राहता. कुठेतरी मनाच्या कप्प्यातला नाजूक कोपरा उघडला जातो. मनामध्ये असणाऱया काही अनमोल वा अविस्मरणीय आठवणींपैकी एखादी आठवण जागी होते नि तुम्ही त्यामध्ये हरवून जाता. खूपदा अशा आठवणीत काही व्यक्ती, तर काही प्रसंग असतात. त्यातील बरेचसे आपल्याला अस्वस्थ करणारे, बेचैन करणारे, काही खुदकन हसवणारे तर काही ओशाळवाणे करणारेही असू शकतात. आजवरच्या माझ्या ज्योतिष शास्त्राचा समुपदेशक म्हणून काम करण्याच्या वाटचालीत असे भरपूर प्रसंग वा खूप चित्रविचित्र माणसे भेटलीत. त्याचाच हा लेखाजोखा …
आजपासून हळूहळू एक-एक आठवण वा प्रसंग उलगडून दाखवणार आहे. तर ही घटना आहे मी ज्योतिष शास्त्राकडे वळण्याच्या आधीची. त्यावेळी मी मुंबईतील एका औषधांच्या कंपनीत वैद्यकीय प्रतिनिधी किंवा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करत होतो. दक्षिण मुंबई हा मुख्यत्वे माझा कामाचा विभाग. आता मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काय काम, तर तुमच्या नेमून दिलेल्या विभागातील डॉक्टरांची यादी बनवणं आणि वेगवेगळ्या दिवशी त्यांना भेटून तुमच्या कंपनीच्या प्राडक्टबद्दल माहिती देणं. या कामाला डिटेलिंग म्हणतात आणि हे डिटेलिंग जास्तीत जास्त दोन ते तीन मिनिटांत संपवायचं असतं. या कामादरम्यान काही काही डॉक्टर तुमच्याशी खूप मैत्रीपूर्ण संबंधाने वागायचे, चांगली वागणूक द्यायचे. अर्थात आमची कंपनीसुद्धा डॉक्टरांना चांगले कमिशन, भेटवस्तू वा इतर काही ना काही टूर वगैरे द्यायची.
…तर शिवाजी पार्क भागात एका डॉक्टरांचा दवाखाना त्या वेळी होता आणि त्या ठरावीक वाराला मी त्यांच्याकडे जात असे. ते डॉक्टर फार अनुभवी, तरीही साधे होते. त्यांच्याकडे गेल्यावर नेहमीप्रमाणे डिटेलिंग करून झाल्यावर ते मला चहा वगैरे ऑफर करायचे. चहा पिता पिता आमच्या गप्पा सुरू असायच्या. ते त्यांच्या तरुणपणाच्या देशाच्या तत्कालीन स्थितीबद्दल काहीबाही सांगायचे. त्यांच्या वेळी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्योत्तर काळातही कसे मोठमोठे विद्वान नेते, विचारवंत होते नि समाजसुधारक होते हे सांगायचे. अशा मान्यवर विचारवंतांचे विचार ऐकायला डॉक्टर व त्यांचे समकालीन कसे धडपड करायचे वगैरे वगैरे असायचं. हे असं तीन-चार वेळा ऐकून घेतल्यावर एकदा मी त्यांना म्हणालो, “सर, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण तुमच्या वेळी एकापेक्षा एक मातब्बर नेते होते, समाजसुधारक होते, विचारवंत होते. आता आमच्या काळात आम्हाला तरी कुणी दिसत नाही. ज्याच्या पायावर आम्ही डोकं ठेवावं असे आता कुणीही नाही!”
माझ्या या वक्तव्यावर ते एकदम उसळून म्हणाले, “अहो, कुणी नसेल तर तुम्ही व्हा मोठी, तुम्ही करा काहीतरी. स्वयंप्रकाशित व्हा!” त्यांचे हे बोल ऐकून मी एकदम निरुत्तर झालो आणि सर्द होऊन त्यांच्याकडे पाहतच राहिलो.
पटलं की, खरंच आहे डॉक्टरांचं! आपण या बाजूने कधी विचारच केला नव्हता. नेहमी एकच बाजू पाहतो, परंतु कुठल्याही परिस्थितीचा सगळ्या बाजूंनी विचार नाही करत. जर एखाद्या विषयात चूक वाटत असेल तर त्याविषयी त्रागा करण्यापेक्षा आहे त्यात चांगला बदल कसा करता येईल हेसुद्धा आपण पाहू शकतोच ना!
नसतील आता आदर्शवादी वा मान्यवर मंडळी, पण तसे आदर्शवादी वा मान्यवर होण्यापासून आपल्याला कुणी रोखलंय! उगीच परिस्थितीला वा अन्य काही घटकांना दोष देऊन मजा पाहण्यापेक्षा स्वत काहीतरी भरीव व लोकोपयोगी करणं कधीही चांगलंच हे पटलं मनाला आणि आपलं आयुष्य अधिक समृद्ध व विकसित कसं करता येईल याचा शोध सुरू झाला. त्यानंतर काही कारणास्तव कंपनीने माझा कामाचा विभाग बदलला, डॉक्टरांकडे जाणं कमी झालं. नंतर कधीतरी खूप वर्षांनी त्या बाजूला गेलो तर तिथे दवाखाना वगैरे काही नव्हता. आज जरी तिथे डॉक्टर नसले तरी त्यांनी नकळत दिलेली शिकवण कायम लक्षात राहिली. स्वयंप्रकाशित व्हा!
[email protected]































































