
>> दिलीप जोशी
लोकमान्यांच्या शेवटच्या काळातील भाषणाचा त्यांचा आवाज उपलब्ध नाही, परंतु त्या काळी अनेक पुढाऱयांच्या आवाजाची अगदी हुबेहूब नक्कल करणारे श्री. भोंडे यांच्या आवाजातील ‘ते’ भाषण प्रभाकर दातारांकडून मला 47 वर्षांपूर्वी मिळाले. टिळकांच्या मनातलं एकमेव कार्य म्हणजे ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’. हाच खरा लोकमान्यांचा आवाज आहे.
आज 31 जुलै. याच तारखेला 1920 मध्ये मध्यरात्रीनंतर काही वेळाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे मुंबईतील सरदार गृह येथे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीची तारीख 1 ऑगस्ट आहे. टिळकांचा जन्मही जुलै महिन्यातलाच. 23 जुलै 1856 ते 1 ऑगस्ट 1920 असा त्यांचा जीवनपट.
राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1884 मध्ये पुण्यात व्हायची होती, परंतु प्लेगमुळे 1885 मध्ये ती मुंबईत झाली आणि तेव्हापासून देशाच्या राजकारणातलं मुंबईचं महत्त्व वाढलं. सुरुवातीच्या काळात काँग्रेसचे दादाभाई नवरोजींसारखे पुढारी नेमस्तपणे देशवासीयांच्या मागण्या सरकारपुढे मांडत होते. तो काळ व्हिक्टोरिया राणीचा होता. रेल्वे, पोस्ट खाते अशा सुधारणा आणि सामाजिक, धार्मिक बाबतीत हस्तक्षेप न करण्याचं त्यांचं धोरण तसंच पाश्चात्ये जगातील आधुनिक यंत्रयुगाचा परिचय यातून ‘साहेबाचे राज्य बरे’ असेही अनेकांना वाटू लागले होते. मात्र अनेक ठिकाणी ब्रिटिश सत्तेचे काळे कायदे आणि देशाची आर्थिक पिळवणूक हळूहळू सर्वच समाजधुरिणींच्या आणि नेत्यांच्या लक्षात येऊ लागली. सरकारकडे सनदशीर मार्गाने आपल्या मागण्या काँग्रेस व्यक्त करू लागली. टिळकांच्या काँग्रेस प्रवेशानंतर त्याला जहाल वळण प्राप्त झाले. सरकारच्या अन्यायी धोरणाविरुद्ध त्यांनी ‘केसरी’ वृत्तपत्रातून टीकेची झोड उठवली. हिंदुस्थानभरात अनेक ठिकाणी सभा, बैठका घेऊन ते आपले मत मांडू लागले. आधुनिक पद्धतीने लोकांच्या सभांमध्ये देशभर फिरून भाषणांतून जनजागृती करणारे टिळक पहिलेच. त्यातूनच ते ‘लोकमान्य’ झाले. महात्मा गांधी त्यांचा उल्लेख ‘टिळक महाराज’ असा करत यावरून हे लक्षात येईल.
उदंड लोकप्रियता आणि प्रचंड टीका याला सामोरं जात टिळकांचं 64 वर्षांचं जीवन गेलं. त्यातच त्यांना 1908 मध्ये मंडाले (म्यानमार) येथे सहा वर्षे काळय़ा पाण्याच्या शिक्षेसाठी डांबण्यात आले. हा निर्णय मुंबईच्या हायकोर्टात दिला गेला तेव्हा ‘‘नियती ठरविणारी यापेक्षा वरच्या यंत्रणा आहे’’ असं बजावून टिळक बाणेदारपणे उत्तरले ‘‘मी हाती घेतलेलं कार्य, मी मुक्त राहण्यापेक्षा माझ्या यातनांनी अधिक फोफावेल अशी नियतीची इच्छा दिसते.’’ त्यांचे हे उद्गार ऐकून अवघं न्यायालय स्तिमित झालं.
पुण्यात त्यांना त्यांच्या शेवटच्या काळात मानपत्र दिलं गेलं त्या भाषणाचा त्यांचा आवाज उपलब्ध नाही, परंतु त्या काळी अनेक पुढाऱयांच्या आवाजाची अगदी हुबेहूब नक्कल करणारे श्री. भोंडे यांच्या आवाजातील ‘ते’ भाषण प्रभाकर दातारांकडून मला 47 वर्षांपूर्वी मिळाले. प्लेगसंदर्भात आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन टिळकांनी जनतेला करावे असे इंग्रज सरकारलाही वाटले म्हणून त्यांची काही मिनिटांची फिल्म घेतली गेली होती असे म्हणतात. आता ती प्रयत्नपूर्वकही सापडत नाही. लोकमान्यांच्या अंत्ययात्रेची फिल्मही होती. त्यातील अवघ्या 30 सेकंदांचं चित्रण यू-टय़ूबवर पाहायला मिळतं. काँग्रेस अधिवेशनातील त्यांची फिल्मही सापडत नाही. मात्र गायनाचार्य बखलेबुवांच्या कार्यक्रमाच्या वेळी जे निवेदन केलं गेलं ते अलीकडे टिळकांचं असल्याचं प्रसृत झालं आहे.
माझ्याकडील आप्पासाहेब भोंडे यांच्या उसन्या, परंतु बहुधा वृद्ध टिळक तसंच बोलले असावेत अशा ‘आवाजा’त ते म्हणतात, ‘‘…मला तुम्ही हे जे मानपत्र देताहात ते मला देत नसून मी जी काही राष्ट्राची महत्त्वाची कामगिरी बजावली आहे त्याबद्दल देताहात हे मी पूर्णपणे जाणून आहे. ही कामगिरी काही चार-दोन वर्षांत पुरी होणारी नाही.’’ त्यासाठी तरुणांनी, विशेषतः मराठी तरुणांनी कष्टसाध्य प्रयत्न करावेत असं टिळकांचं आवाहन आहे. ते म्हणतात ‘‘मी आता म्हातारा झालेला आहे. (उद्या मी नसलो तरी) देशभक्ती चिरंतन असते. संधी उपलब्ध असली तरी प्रयत्नांनी मिळवावी लागते. माझ्या गळय़ात घातलेला हार कोमेजून जाईल. मानपत्र कदाचित फाटून जाईल परंतु, कार्यसिद्धी महत्त्वाची. त्यांच्या मनातलं एकमेव कार्य होतं ते ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ या त्यांच्या वाक्यातून अमर झालं. लोकमान्यांना देश स्वतंत्र झालेला पाहायला मिळाला नाही, पण त्यांचं योगदान विसरता येणार नाही.





























































